आबदारकडून परमिंदर सिंग चित

By Admin | Updated: February 20, 2015 23:10 IST2015-02-20T22:43:13+5:302015-02-20T23:10:50+5:30

चिंचोलीत कुस्ती मैदान: मारुती जाधवची समाधान घोडकेवर मात

Parminder Singh Chit from Aabdar | आबदारकडून परमिंदर सिंग चित

आबदारकडून परमिंदर सिंग चित

येळापूर (जि.सांगली) : चिंचोली (ता. शिराळा) येथे आत्मलिंग देवाच्या यात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती मैदानात उपमहाराष्ट्र केसरी नंदू आबदार याने भारत केसरी परमिंदर सिंग याला ९ व्या मिनिटाला पोकळ घिस्सा डावावर अस्मान दाखवले. नंदू आबदार याला प्रथम क्रमांकाचे दीड लाखाचे बक्षिस देवून गौरविण्यात आले.
कुस्ती मैदानाचे उद्घाटन सरपंच अमर पाटील, डी. आर. जाधव, उत्तम पाटील, चंदर पाटील, संपत जाधव, दत्ताजी पाटील, शिवाजी पाटील, तानाजी जाधव यांच्याहस्ते करण्यात आली. यावेळी आर. आर. पाटील यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
द्वितीय क्रमांकाच्या १ लाख रुपये इनामासाठी महाराष्ट्र चॅम्पियन मारुती जाधव व महाराष्ट्र केसरी समाधान घोडके यांच्यात लढत झाली. या लढतीत चौथ्या मिनिटाला डंकी डावावर मारुतीने समाधानला चितपट केले. तृतीय क्रमांकाच्या ७५ हजाराच्या बक्षिसासाठी लावण्यात आलेल्या कुस्तीमध्ये विष्णू धुमछडी याने गणेश जगतापला गुणांवर पराजीत केले. चौथ्या क्रमांकाच्या लढतीत नाना ठोंबरने जयपाल वाघमोडेस आकडी डावावर चितपट केले. पाचव्या क्रमांकाच्या लढतीमध्ये समीर देसाई याने धनाजी पाटीलवर गुणाने विजय मिळविला. सहाव्या क्रमांकाच्या लढतीत प्रदीप जाधव (मुंबई पोलीस) याने हरेल पाटील याच्यावर एकचाक डावावर पाचव्या मिनिटाला विजय मिळवला.
मैदानातील अन्य विजयी मल्लांमध्ये राहुल पाटील, राहुल जाधव, उदय जोंधळे, अमृत जाधव, प्रकाश जाधव, सचिन शेडगे, संदीप माने, किरण शेडगे, ऋषीकेश जाधव, कपील पाटील, उत्तम घोलप, राजेश जाधव, दत्ता बनकर, अभिजीत भोसले, सागर निकम, गणेश गुरव, प्रथमेश पाटील, अक्षय जाधव, विक्रम चव्हाण, विशाल जाधव, रणजीत पाटील, मारुती सावंत, रविराज यादव, धैर्यशील सकटे, सुशिल गायकवाड, सत्यजित जाधव, अभिजीत बनकर, शंभूराजे पाटील, अक्षय सुतार, सोनू लाड, प्रशांत कुंभार, अजय केसरे, अरविंद पाटील यांचा समावेश आहे.
मैदानास आमदार शिवाजीराव नाईक, काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख, हणमंत पाटील, माथाडी नेते बबनराव चिंचोलकर, नामदेवराव मोहिते, विकास नांगरे, उद्योजक युवराज पवार, संभाजी ढवळे, लक्ष्मण भोसले, जालिंदर पाटील, विलास जाधव, अमर पाटील, बाबजी पाटील, शिवाजी लाड, राजू गोळे, जयवंत कडोले उपस्थित होते. बंडा पाटील रेठरेकर, हणमंतराव जाधव, विकास पाटील, दत्ता जाधव, कृष्णा कळंत्रे, संदीप पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले. (वार्ताहर)

Web Title: Parminder Singh Chit from Aabdar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.