बसस्थानके ठरताहेत पार्किंगचा अड्डा
By Admin | Updated: January 12, 2016 00:38 IST2016-01-11T23:14:12+5:302016-01-12T00:38:32+5:30
आगार प्रमुखांचे दुर्लक्ष : शिरोळच्या एस.टी.ला ऊर्जितावस्था देण्याची गरज; बस फिरविण्यास मोठा अडथळा--कुरुंदवाड आगाराचं दुखणं

बसस्थानके ठरताहेत पार्किंगचा अड्डा
संदीप बावचे-- जयसिंपूर कुरुंदवाड एसटी आगार प्रमुखांच्या दुर्लक्षामुळेच जयसिंगपूर बसस्थानक, रेल्वे स्नेशनजवळील पिकअप शेड खासगी वाहनस्थळ बनले आहे. याठिकाणी चारचाकी व दुचाकी वाहने सर्रास उभी केली जात आहेत. याकडे लक्ष देण्याची गरज असून, किमान अशा वाहनधारकांकडून कर गोळा करावा, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
शहरातील बसस्थानकावरील स्वच्छतेबाबत तक्रारी केल्यानंतरच वाहतूक नियंत्रकांकडून याकडे लक्ष देऊन स्वच्छता ठेवली जाते, ही परिस्थिती आहे. कोथळी, उमळवाड, चिंचवाड येथील नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या प्रवासी निवारा शेडसमोरच खासगी वाहनधारक वाहने लावत असल्यामुळे प्रवाशांना उन्हात उभे राहावे लागत आहे. तसेच या ठिकाणी बस फिरविण्यास मोठा अडथळा बनत आहे.
वाहतूक नियंत्रक कक्षासमोर बेशिस्तपणे अनेक दुचाकी वाहने उभी केली जातात. तसेच धूमस्टाईलने महाविद्यालयीन युवक दुचाकी पळवितात. याचा त्रास प्रवाशांना होतो. केवळ बसस्थानक वाहतूक नियंत्रक यांच्याकडून साऊंड सिस्टीमद्वारे खासगी वाहने काढण्यासाठी आवाहन केले जाते. दररोज हा प्रकार घडत असताना वाहतूक नियंत्रकांकडून पोलीस कारवाईसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. (समाप्त)
खासदार, आमदार लक्ष देणार का?
कुरुंदवाड आगाराला ऊर्जितावस्था देण्याची आज गरज बनली आहे. ३४ वर्षे सेवा देणारी एसटी सेवा अनेक समस्यांतून मार्गक्रमण करीत आहे. उत्पन्न वाढीबरोबर प्रवासी वर्गाला आणखी चांगल्या सोयी-सुविधा पुरविण्यासाठी गरज आहे ती शासनाच्या मदतीची. यामुळे शिरोळ तालुक्यातील असलेले खा. राजू शेट्टी व आ. उल्हास पाटील यासाठी पुढाकार घेतील, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे.
‘लोकमत’चे अभिनंदन
‘कुरुंदवाड आगाराचं दुखणं’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या मालिकेचे प्रवासी वर्गातून स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे ‘मुंबईला एसटीच नाही’ हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक प्रवाशांनी याला दुजोरा देत एसटीबस सुरू होण्याची गरज असल्याचे सांगून ‘लोकमत’चे अभिनंदन केले.
कारवाई करा
सांगली-कोल्हापूर रस्त्यावर वाहन पार्किंगला जागा नसल्यामुळे व जयसिंगपूर बसस्थानकाच्या समोरच बगीचा असून याठिकाणी जाणारे वाहनधारकही बसस्थानकाच्या परिसरात वाहन पार्किंग करून जात असतात. यामुळे अशा वाहनांवर कारवाई करून वाहने उभे करण्यास मज्जाव करण्याची गरज आहे.
पार्किंग अड्डा
सांगली-कोल्हापूर महामार्गावर असलेल्या जयसिंगपूर शहरात २५ हून अधिक आसपासच्या गावांतील नागरिकांची वर्दळ असते. या बसस्थानकातून दररोज १६०० बसेस ये-जा करतात. याठिकाणी प्रमुख बाजारपेठ, महाविद्यालय, शाळा, रुग्णालय या ठिकाणी असल्यामुळे मोठी गर्दी असते. प्रमुख मार्गावर वाहन पार्किंगसाठी जागा नसल्यामुळे मध्यवस्तीत वाहन पार्किंगचे एकमेव ठिकाण म्हणून बसस्थानकाकडे पाहिले जाते.