तीन दशकांचे अथक परिश्रम अन् फुललेले नंदनवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:16 IST2021-07-01T04:16:44+5:302021-07-01T04:16:44+5:30
वर्ष १९८९-९०... अत्यंत दूरदृष्टीचा तरुण तळसंदे (जि. कोल्हापूर) सारख्या माळरान जमिनीवर नंदनवन फुलवण्याचे, हा कॅम्पस 'एज्युकेशन हब' बनवण्याचे स्वप्न ...

तीन दशकांचे अथक परिश्रम अन् फुललेले नंदनवन
वर्ष १९८९-९०... अत्यंत दूरदृष्टीचा तरुण तळसंदे (जि. कोल्हापूर) सारख्या माळरान जमिनीवर नंदनवन फुलवण्याचे, हा कॅम्पस 'एज्युकेशन हब' बनवण्याचे स्वप्न पाहतो. तीन दशकांच्या अथक परिश्रमातून कृषीविषयक विविध प्रयोग, शिक्षण संस्था असा विस्तार करत या ठिकाणी कृषी व तंत्र क्षेत्रातील विद्यापीठाची स्थापना करतो. डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील हे या जिद्दी तरुणाचे नाव... तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे आज गुरुवारी उद्घाटन होत असून डॉ. संजय डी. पाटील यांनी पाहिलेल्या त्यांच्या स्वप्नाचा प्रवास आज खऱ्या अर्थाने वास्तवात उतरत आहे त्यानिमित्ताने...
संपूर्ण देशभरात उत्तम गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या डी. वाय. पाटील ग्रुपच्या पहिल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची ३७ वर्षांपूर्वी १९८४ मध्ये डॉ. डी. वाय पाटील (दादासाहेब) यांनी कसबा बावडा (कोल्हापूर) येथे स्थापना केली. आपले पुत्र संजय पाटील यांच्याकडे त्यांनी या महविद्यालयाचे नेतृत्व सोपवले. संजय पाटील यांना सुरुवातीपासूनच कृषी क्षेत्राची आवड होती. दादासाहेबांनी ही आवड ओळखून त्यांना शेती खरेदी करण्यास प्रेरणा दिली. त्यानुसार डॉ. संजय पाटील यांनी वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी तळसंदे येथे १९८९-९० मध्ये १४८ मालकांना एकत्र आणत २०५ एकर शेतीची खरेदी केली.
त्यावेळी हे क्षेत्र म्हणे एक माळरान होते. डोंगराळ, मुरबाड असलेल्या या जमिनीवर डॉ. संजय पाटील यांनी प्रचंड मेहनत घेतली. डॉ. संजय पाटील यांच्याकडून शेतीतील विविध प्रयोग या ठिकाणी करण्यात आले. कृषी क्षेत्रातील विविध प्रयोगांची दखल घेत डॉ. संजय पाटील यांना वसंतराव नाईक कृषिभूषण, इंदिरा प्रियदर्शिनी, बळीराजा, सकाळ अॅग्रोवन एक्सलन्स अॅवाॅर्ड, विद्याभारती, 'वनश्री पुरस्कार', गोल्डस्टार इंटरनॅशनल अॅवाॅर्ड यासह अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. बेंगळुरू येथील अखिल भारतीय आंबा महोत्सवात प्रथम क्रमांकाने त्यांना सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक कार्याबद्दल त्यांना हिमाचल प्रदेश विद्यापीठाने 'डॉक्टरेट' देऊन गौरवले आहे.
कृषिविषयक अद्ययावत ज्ञान, नवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी १९९१ मध्ये या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्राची स्थापना करण्यात आली. या विस्तीर्ण परिसरात सध्या ॲग्रिकल्चर, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर व एमबीए महविद्यालय सुरू असून साडेतीन हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
कृषी क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण अनुभवी शिक्षण देणारे विद्यापीठ व्हावे, असे स्वप्न डॉ. संजय डी. पाटील यांनी पाहिले होते. त्यानुसार तळसंदे येथील कॅम्पसमध्ये 'डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ' हे खासगी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी राज्य शासनाकडे विनंती अर्ज करण्यात आला. ९ डिसेंबर २०२० ला राज्य मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली. १५ डिसेंबर २०२० ला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी हे विद्यापीठ स्थापन करण्याबाबतच्या कायद्याला मंजुरी दिली. त्यानंतर माननीय राज्यपाल महोदयांनी २८ डिसेंबर २०२० रोजी या कायद्यावर स्वाक्षऱ्या करून त्याला अधिस्वीकृती दिली.
त्यानुसार २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून नवे विद्यापीठ कार्यरत होत असून त्याचा आज १ जुलै रोजी शुभारंभ होत आहे. दादासाहेब व आईसाहेबांचा आशीर्वाद, डॉ. संजय पाटील यांचे नियोजन व धाकटे बंधू संस्थेचे उपाध्यक्ष सतेज पाटील व पुत्र विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांच्या विशेष प्रयत्न व मेहनतीमधून हे विद्यापीठ आजपासून शैक्षणिक सेवेत रुजू होत आहे. राज्यभरात 'कृषी दिन' म्हणून साजरा होत असतानाच माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतून या विद्यापीठाचा ऑनलाइन उद्घाटन सोहळ्याचा दुग्धशर्करा योग यानिमित्ताने जुळून आला आहे.