कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून फेडला पैरा !
By Admin | Updated: April 9, 2015 00:00 IST2015-04-08T23:46:02+5:302015-04-09T00:00:52+5:30
राष्ट्रवादीच्या नेत्यांचे राजकारण : ‘गोकुळ’साठी सत्तारूढ गटातून घाटगेंना रोखले हेच तडजोडीचे फलित

कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून फेडला पैरा !
कोल्हापूर : सत्तारूढ गटातून संजय घाटगे यांच्या उमेदवारीचा पत्ता कापून त्यांची आर्थिक व राजकीय कोंडी करण्यात राष्ट्रवादीचे नेते यशस्वी झाले असले, तरी त्यांच्या पदरात काय पडले, हे महत्त्वाचे आहे. कागल, राधानगरी व भुदरगडमधील ‘राजकारणाचे साटेलोटे’ करताना कार्यकर्त्यांना संधी देण्यापेक्षा विरोधकांना नामोहरम करण्याचे नकारात्मक राजकारण केल्याची संतप्त प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमधून उमटू लागली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कमावले तर काहीच नाही, पण कार्यकर्त्यांचा विश्वास मात्र गमावला, एवढेच म्हणावे लागले.
‘गोकुळ’ची निवडणूक लागल्यापासूनच राष्ट्रवादी काँग्रेस सत्तारूढ गटाला ‘बाय’ देण्याच्या पवित्र्यात होती. विधानसभा निवडणुकीत कागलमधून रणजित पाटील यांनी आमदार हसन मुश्रीफ, राधानगरी-भुदरगडमधून राहुल देसाई व अरुण डोंगळे यांनी के. पी. पाटील यांना मदत केली होती. विधानसभेचा ‘पैरा’ फेडण्यासाठी मुश्रीफ व के. पी. पाटील यांनी ‘गोकुळ’च्या निवडणुकीत सर्व ताकद सत्तारूढ गटाच्या मागे लावण्याचा निर्णय घेतला; पण जय-पराजयाची चिंता न करता राष्ट्रवादीने विरोधकांसोबत जाऊन निवडणूक लढवावी, अशी मागणी पक्षाच्या कार्यकर्त्यांची होती. तसे त्यांनी उघडपणे नेत्यांना सुनावले होते. मुळात शिरोळ, चंदगड, कागल व राधानगरीवगळता पक्षाचे अस्तित्व शोधावे लागत आहे, त्यात असे निर्णय घेतले तर भविष्यात कार्यकर्तेच शोधावे लागतील, अशा भाषेत प्रमुख कार्यकर्त्यांनी सांगितले होते. तरीही ‘पैरा’ फेडण्याच्या नादात कार्यकर्त्यांच्या भावना धुडकावण्याचे काम नेत्यांनी केल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
‘गोकुळ’मध्ये राष्ट्रवादीने जागेची मागणी कमी केली; पण कागल मतदारसंघातील शत्रू संजय घाटगे यांची उमेदवारी कापण्यासाठीच त्यांचे प्रयत्न सुरू होते. अंबरिश घाटगे यांना उमेदवारी मिळाली तर आगामी विधानसभा निवडणुकीत ते डोकेदुखी ठरेल या भीतीपोटीच घाटगेंचा पत्ता कापण्यासाठी राष्ट्रवादीची सगळी ताकद पणाला लावली होती. एकीकडे कार्यकर्ते निवडणुकीसाठी आक्रमक झाले असताना नेत्यांनी विधानसभेतील पैरा फेडण्यासाठीच तडजोडी सुरू ठेवल्या. राष्ट्रवादीकडे जिल्ह्यात किमान ४५० ठराव आहेत. त्यामुळे त्यांना किमान चार-पाच जागा देणे अपेक्षित होते; पण नेत्यांनी केलेल्या ‘सोयीच्या राजकारणा’चा फटका कार्यकर्त्यांना बसला. हसन मुश्रीफ यांनी संजय घाटगे यांचा पत्ता कापण्यासाठी प्रयत्न केले, तर के. पी. पाटील यांनी ‘भोगावती’ व ‘बिद्री’चे राजकारण डोळ्यासमोर ठेवून एक जागा पदरात पाडून घेतली. उर्वरित जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम केले.
करवीर, हातकणंगले, शाहूवाडी, पन्हाळा येथील कार्यकर्त्यांना बळ देणे गरजेचे होते; पण नेत्यांनी सोयीसाठी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीत कार्यकर्त्यांचा विश्वास गमावला, असे म्हणावे लागेल.
अंबरिशच्या उमेदवारीशी माझा काय संबंध..? : मुश्रीफ
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत सत्तारूढ गटाला ‘बाय’ देऊन आपण विधानसभा निवडणुकीतील पैरा फेडला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
सत्तारूढ आघाडीतील एका जागेसाठीच तुम्ही सगळी ताकद पणाला लावली का, अशी विचारणा पत्रकारांनी केल्यावर मुश्रीफ काहीसे निरुत्तर झाले. त्याबद्दल मला काही बोलायचे नाही, असे सांगत त्यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली.
सत्तारूढ आघाडीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर पत्रकारांनी त्यांची शासकीय विश्रामधामवर भेट घेतली व राष्ट्रवादीने काँग्रेसला का ‘बाय’ दिला, अशी विचारणा केली.
ते म्हणाले, ‘विधानसभा निवडणुकीत आम्ही अरुण डोंगळे, धैर्यशील देसाई व रणजित पाटील यांना ‘गोकुळ’साठी तुम्हाला मदत करतो, असा ‘शब्द’ दिला होता. त्यांच्यासाठी आम्हाला सत्तारूढ आघाडीबरोबर समझोता करणे भाग पडले, अन्यथा ती गद्दारी ठरली असती.
विधानसभा निवडणुकीत सतेज पाटील यांचीही आम्हाला मदत झाली. त्यामुळे त्यांचाही आमचा पैरा पहिल्यांदा फेडा, असा आग्रह होता, परंतु ते शक्य झाले नाही; परंतु भविष्यात त्यांचा पैरा नक्कीच फेडू.’
एका प्रश्नावर त्यांनी अंबरिश घाटगे यांची सत्तारूढ आघाडीतील उमेदवारी रद्द करण्यात माझा काहीही संबंध नसल्याचे उत्तर दिले. मी काय त्यासाठी विरोध केला नव्हता, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
त्यावर पत्रकारांनी त्यांना एकाच जागेसाठी तुम्ही हे सगळे केले का, अशी विचारणा केल्यावर मुश्रीफ निरुत्तर झाले. मला यावर काही बोलायचे नाही, असे सांगत त्यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली.