पेपरलेस कामकाज करणार : पाटील
By Admin | Updated: June 15, 2014 01:52 IST2014-06-15T00:57:32+5:302014-06-15T01:52:17+5:30
सभासदांचा सन्मान हाच अजेंडा : कौटुंबिक वातावरणात जिल्हा परिषद सोसायटीची सभा

पेपरलेस कामकाज करणार : पाटील
कोल्हापूर : मुख्य कार्यालयासह चार शाखा संगणकीकृत करून इंटरनेटने जोडल्या आहेत. आगामी काळात जिल्हा परिषद सोसायटीचे कामकाज पेपरलेस केले जाईल, अशी ग्वाही अध्यक्ष एम. आर. पाटील यांनी दिली. संस्थेला आर्थिक स्थैर्य देत असताना सभासदांचा सन्मान हाच अजेंडा पाच वर्षांत राबविल्याने राज्यातील आदर्श पतसंस्था करू शकलो, असेही त्यांनी सांगितले. कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या ४८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
अध्यक्ष पाटील म्हणाले, पाच वर्षांपूर्वी सभासदांनी विश्वास दाखवून बिनविरोध निवडणूक करून काम करण्याची संधी दिली. त्यावेळी सोसायटीला महसुली जप्तीची नोटीस लागू झाली होती. अशा परिस्थितीत काम करीत सोसायटीला आर्थिक स्थैर्य देण्याचा प्रयत्न केला. वसुलीचे नेटके नियोजन केले व त्यामध्ये सभासदांचा कृतिशील सहभाग राहिल्याने नऊ कोटींनी कर्जपुरवठा वाढवून साडेपाच कोटींच्या ठेवी वाढवू शकलो. कर्मचारी हा संस्थेचा आत्मा आहे. या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर तेवढाच सन्मान देण्याचा प्रयत्न आहे. यासाठी नवीन इमारतीमध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी स्वतंत्र कक्ष (खोली) देण्यात येणार असल्याचे एम. आर. पाटील यांनी सांगितले. शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे, व्ही. बी. साबळे, माजी सभापती आर. डी. यादव, ग्रामसेवक संघटनेचे राज्य सचिव के. आर. किरूळकर, शिक्षक नेते कृष्णात कारंडे, ए. बी. कांबळे, जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सागर चव्हाण व संचालक उपस्थित होते. (प्रतिनिधी)