पानसरेंचे मारेकरी मोकाट का?

By Admin | Updated: July 20, 2015 00:23 IST2015-07-20T00:20:18+5:302015-07-20T00:23:26+5:30

दाभोलकर-पानसरे विचार मंचचा सवाल : निषेध फेरीत मुख्यमंत्र्यांचा धिक्कार

Pansar's killers? | पानसरेंचे मारेकरी मोकाट का?

पानसरेंचे मारेकरी मोकाट का?

कोल्हापूर : शहीद दाभोलकर आणि पानसरे विचार मंचतर्फे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या निषेध फेरीमध्ये भाजप सरकार आणि पोलीस प्रशासनाचा तीव्र निषेध करण्यात आला़ यावेळी ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील मुर्दाबाद’ आदी घोषणा दिल्या़ रेखाचित्रे प्रसिद्ध करूनही मारेकऱ्यांना पकडण्यात अद्याप का अपयश येत आहे, याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे, अशी मागणीही करण्यात आली़
राजारामपुरीतील जनता बझार येथून सायंकाळी साडेसहा वाजता या निषेध फेरीला प्रारंभ झाला़ गोविंद पानसरे आणि डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रतिमांचे फलक हाती घेतलेले कार्यकर्ते या फेरीत सहभागी झाले़ ‘गोविंद पानसरे अमर रहे’, ‘पानसरे आणि दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे’, ‘आरएसएस मुर्दाबाद’, ‘मुख्यमंत्री मुर्दाबाद’, ‘पालकमंत्री मुर्दाबाद’ अशा घोषणा देत ही फेरी राजारामपुरी मुख्य रस्ता, मारुती मंदिर, नार्वेकर भाजी मंडई, प्रतिभानगर रोडमार्गे हुतात्मा स्मारक येथे सातच्या सुमारास पोहोचली़
मारेकऱ्यांच्या तपासात शासन व पोलिसांना आलेल्या अपयशाचा खरपूस समाचार यावेळी घेण्यात आला़ मेघा पानसरे म्हणाल्या, डॉ़ दाभोलकरांच्या हत्येला दोन वर्ष पूर्ण होत आली आहेत, पानसरें यांच्या हत्येला पाच महिने झाले असले, तरी त्यांच्या मारेकऱ्यांना पकडलेले नाही. मारेकऱ्यांचा तपास करण्याची शासनाची इच्छाच नसल्याचे दिसून येत आहे़ पोलिसांकडून तपासामध्ये प्रगती नाही़ त्यामुळे तपासाबाबतची आशा अंधुक होत आहे, पण तरीही आम्ही मागे हटणार नाही़
यावेळी मारेकऱ्यांचा लवकर तपास करावा, आमच्या संयमाला मर्यादा आहेत़ हा संयम सुटल्यास त्याची जबाबदारी पोलीस आणि शासनाची असेल, असा इशाराही देण्यात आला़ यावेळी ‘मुख्यमंत्री जवाब दो’, ‘दणा दणा दणा वणवा पेटला दणा दणा अन् या सरकारला हाणा ना’ अशा घोषणांनी हुतात्मा पार्क परिसर दणाणून गेला़ पानसरेंच्या मारेकऱ्यांना त्वरित पकडावे या मागणीचे निवेदन आज, सोमवारी जिल्हा पोलीसप्रमुखांना देणार असल्याचेही सांगण्यात आले़
या निषेध फेरीमध्ये दिलीप पोवार, अतुल दिघे, सुभाष जाधव, प्रा़ विलास रणसुभे, एम़ बी़ पडवळे, एस़ बी़ पाटील, बाबूराव कदम, आशा कुकडे, अरुण पाटील, प्रभाकर आरडे, बाळ पोतदार, रमेश वडणगेकर, सुभाष वाणी, सुजाता म्हेत्रे, रसिया पडळकर, उमेश पानसरे, गीता हासूरकर, कुमार दाभाडे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते़ (प्रतिनिधी)

Web Title: Pansar's killers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.