पानसरेंचे मारेकरी कोण..सनातनी सनातनी
By Admin | Updated: February 22, 2015 01:07 IST2015-02-22T00:52:32+5:302015-02-22T01:07:16+5:30
अंत्ययात्रेत राज्य सरकारचा निषेध : फडणवीस यांच्यासह भाजपचा धिक्कार

पानसरेंचे मारेकरी कोण..सनातनी सनातनी
कोल्हापूर : गोविंद पानसरे यांचे मारेकरी कोण... सनातनी सनातनी...मुर्दाबाद मुर्दाबाद, देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद..धिक्कार असो, धिक्कार असो..काळी टोपी, खाकी चड्डीचा धिक्कार असो, अशा त्वेषाने दिलेल्या घोषणांनी अंत्ययात्रेच्या मार्गावरील वातावरण शेवटपर्यंत तणावपूर्ण राहिले. अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या प्रत्येकाने पानसरे यांच्या हल्ल्यास सनातनी प्रवृत्तींच्या संघटनांनाच थेटपणे जबाबदार धरले. कामगार संघटनांतील हेवेदावे अथवा टोल आंदोलन पुढे करून त्याच्या आडाला हिंदुत्ववाद्यांना लपविले जात असल्याचा गंभीर आरोप यावेळी सर्वच नेत्यांनी केला.
पानसरे यांचे पार्थिव दसरा चौकातील मंडपात ठेवले होते. दुपारी पावणेदोन वाजता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्य सरकारच्यावतीने पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली; पण त्याचवेळी जमावातून भाजप सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा झाल्या. त्यामुळे तिथे फार काळ न थांबताच पाटील यांनी निघून जाणे पसंत केले. पोलिसांनीही त्यांना अंत्यदर्शनासाठी जाऊ नये, अशीच विनंती केली होती. तिथे सुरू झालेल्या भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सरसंघचालक मोहन भागवत, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निषेधाच्या घोषणा स्मशानभूमीत पानसरे यांच्यावरील अंत्यसंस्कारानंतरच थांबल्या.
दुपारी सव्वातीनच्या सुमारास सजविलेल्या ट्रॉलीतून पानसरे यांची अंत्ययात्रा सुरू झाली. पानसरे यांचे पार्थिव लाल झेंड्यामध्ये गुंडाळून शवपेटीत ठेवले होते. शवपेटीही लाल झेंड्यात गुंडाळलेली होती. त्या शेजारी पक्षाचे सच्चे कार्यकर्ते रघु कांबळे, भालचंद्र कांगो, एस. बी. पाटील, विक्रम कदम आणि उमेश पानसरे शोकमग्न बसून होते. सूर्य तापला होता आणि दुसरा सूर्य अखेरच्या प्रवासाला निघाला होता. पानसरे यांचे पार्थिव दसरा चौकातून हलविल्यानंतर दु:खाचा कोलाहल वाढला. अंत्ययात्रा दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ््यास वळसा घालून ही अंत्ययात्रा बिंदू चौकाकडे निघाली. सगळीकडे ‘लाल सलाम, लाल सलाम..’च्या घोषणा आणि फडफडणारे लाल झेंडेच दिसत होते. दुतर्फा लोक जागा मिळेल तिथे उभारून या धीरोदात्त नेत्याचे अंत्यदर्शन घेत होते. घोषणा देणारे तरुण होते, महिला होत्या, कामगार होते, ज्येष्ठ नागरिक होते. अंत्ययात्रा बिंदू चौकातील पानसरे यांच्या भाकप कार्यालयासमोर आली आणि ती काही क्षण स्तब्धच झाली. गर्दीतून आरोळी उमटली, ‘कॉम्रेड गोविंद पानसरेंका अधुरा काम कौन पुरा करेगा..?’ हजारोंनी मुठी आवळून उंचावल्या व त्यास प्रतिसाद दिला. ‘हम करेंगे..हम करेंगे..’ कॉम्रेड अवि पानसरे यांच्या अंत्ययात्रेवेळी गोविंद पानसरे यांनी ३ आॅक्टोबर २००३ ला अशीच दिलेली आरोळी आसमंत भेदून गेली होती. पानसरे यांच्या अंत्ययात्रेत त्यांच्या आठवणी जाग्या झाल्या.
शिवाजी रोडमार्गे अंत्ययात्रा शिवाजी चौकात आली. पुढे महापालिकेच्यावतीने त्यांना पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. जिल्हा व सत्र न्यायालयासमोर बार असो.च्यावतीने आपल्या माजी अध्यक्षास पुष्पचक्र वाहिले. काळा कोट परिधान करून न्यायालयासमोर युक्तिवाद करणारे अण्णा आता कधीच दिसणार नाहीत अशाच भावना तिथे व्यक्त झाल्या. जुना बुधवार पेठेतून अंत्ययात्रा पंचगंगा स्मशानभूमीत पोहोचली, तेव्हा घोषणांना त्वेष चढला होता. कारण अण्णांच्या अखेरच्या निरोपाची वेळ जवळ आली होती...!