पानसरेंचे मारेकरी पोलिसांना सापडले ?
By Admin | Updated: July 25, 2015 01:13 IST2015-07-24T22:51:35+5:302015-07-25T01:13:31+5:30
मुश्रीफांचा गौप्यस्फोट : नावे जाहीर करण्यास सरकारचा विरोध; विधीमंडळाच्या अधिवेशनात जाब विचारणार

पानसरेंचे मारेकरी पोलिसांना सापडले ?
कोल्हापूर : ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत गोविंद पानसरे यांचे सर्व मारेकरी पोलिसांना सापडले असून त्यांची नावे जाहीर करण्यास राज्य सरकार प्रतिबंध करत आहे, असा गौप्यस्फोट माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी येथे केला. खरे मारेकरी कोण आहेत, त्यांची नावे का जाहीर केली जात नाहीत, याचा जाब विधीमंडळाच्या अधिवेशनात आम्ही विचारणार आहोत, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे बांधण्यात येत असलेल्या ज्येष्ठ नेते पानसरे यांच्या स्मारकाच्या कामाचा भूमिपूजन समारंभ शुक्रवारी सकाळी मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला. पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करावी, या मागणीसाठी कोल्हापुरातील पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते प्रत्येक महिन्याला आंदोलन करत आहेत, त्याचा संदर्भ देत मुश्रीफ म्हणाले की, ‘मला पानसरे यांच्या खुनाचा तपास करणाऱ्या एसआयटीमधील एक अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. मारेकरी सापडले आहेत परंतु राज्य सरकार मारेकऱ्यांची नावे जाहीर करण्यास प्रतिबंध करत आहे. जर खुनी सापडले आहेत तर त्यांची नावे जाहीर करून खुन्यांचा खरा चेहरा उघड करण्यास सरकारला आम्ही भाग पाडू. त्यासाठी विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात आवाज उठविणार, आंदोलन करणार आहोत.’
मुश्रीफ यांनी हा गौप्यस्फोट करताच कार्यक्रमस्थळी पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांनी एकच घोषणाबाजी सुरू केली. ‘अमर रहे, अमर रहे, गोविंद पानसरे अमर रहे’ अशा घोषणेने परिसर दणाणून गेला. पानसरे यांच्या स्मारकाचे काम लवकर पूर्ण व्हावे आणि हे स्मारक म्हणजे पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देत राहील, अशी अपेक्षाही मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केली.
श्रमिक प्रतिष्ठान हे पानसरे यांचे एक स्वप्न होते, प्रतिष्ठानला जागा मिळावी म्हणून ते प्रयत्न करत होते. त्यांचे पुरोगामी विचारांचे कार्य पुढे न्यायचे असेल तर त्यासाठी महापालिकेने जागा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना भाकपचे नेते कॉ. भालचंद्र कांगो यांनी केली. पानसरे यांचे खरे मारेकरी जोपर्यंत सापडणार नाहीत, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील, असा निर्धारही कांगो यांनी बोलून दाखविला.
महापालिकेने पानसरे यांचे स्मारक उभारण्याची केवळ घोषणाच केली नाही, तर प्रत्यक्ष कृती करण्याचेही धाडस केले, असा गौरवपूर्ण उल्लेख करत पानसरे यांची कन्या स्मिता व स्नुषा मेघा यांनी हे स्मारक नव्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देत राहील, असा विश्वास व्यक्त केला. प्रारंभी स्थायी समिती सभापती आदिल फरास यांनी स्वागत केले. यावेळी महापौर वैशाली डकरे यांचेही भाषण झाले. उपमहापौर ज्योत्स्ना मेढे-पवार, माजी आमदार बाबूराव धारवाडे, संपतराव पवार-पाटील, प्रल्हाद चव्हाण, आर. के. पोवार, डी. बी. पाटील, चंद्रकांत यादव, दिलीप पवार, नामदेव गावडे, उदय नारकर, राजेश लाटकर, चंद्रकांत घाटगे, शिक्षण मंडळ सभापती महेश जाधव
आदी उपस्थित होते.
(प्रतिनिधी)