पानसरे व्याख्यानमाला १ डिसेंबरपासून
By Admin | Updated: November 23, 2015 00:05 IST2015-11-22T23:33:43+5:302015-11-23T00:05:35+5:30
द्वादशीवार, पी. साईनाथ, तिस्ता सेटलवाड यांची व्याख्याने

पानसरे व्याख्यानमाला १ डिसेंबरपासून
कोल्हापूर : येथील श्रमिक प्रतिष्ठानतर्फे कॉम्रेड अविनाश पानसरे व्याख्यानमाला यंदा १ ते ७ डिसेंबरदरम्यान होत आहे. ‘लोकशाहीला धर्मांधतेचे आव्हान’ हा यंदाच्या व्याख्यानमालेचा मुख्य विषय आहे. दसरा चौकातील शाहू स्मारक भवनात ही व्याख्यानमाला रोज सायंकाळी सहा वाजता होईल. राज्य व देशपातळीवरील नामवंत वक्त्यांचे विचारमंथन ऐकण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे. यंदा ‘लोकमत,’ नागपूरचे संपादक सुरेश द्वादशीवार, ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ, सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड, आदींची व्याख्याने होणार आहेत. व्याख्यानमालेचे यंदाचे तेरावे वर्ष आहे. प्रतिवर्षी या व्याख्यानमालेस वाढता प्रतिसाद मिळत असून ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर यंदा होत असलेल्या या व्याख्यानांना विशेष महत्त्व असल्याची माहिती संयोजक संस्था असलेल्या श्रमिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विलास रणसुभे यांनी शुक्रवारी (दि. २०) पत्रकार परिषदेत दिली. श्रमिक प्रतिष्ठान १९९४ पासून समाज प्रबोधनासाठी विविध उपक्रम राबवीत आहे. शाहीर जागर, अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन, कविसंमेलन, पथनाट्य, नवलेखक शिबिर, आदी उपक्रमही प्रतिष्ठानने घेतले आहेत. अवी पानसरे यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या नावाने ही व्याख्यानमाला दरवर्र्षी होते.
मंगळवारी (ता. १) : वक्ते : ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार : विषय - सेक्युलर. अध्यक्ष - भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. भालचंद्र कांगो.
बुधवारी (ता. २) : राजकीय विश्लेषक किशोर बेडकीहाळ : सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि लोकशाही अध्यक्ष : डॉ. जयसिंगराव पवार
गुरुवारी (ता. ३) : तरुण पत्रकार समर खडस : ‘दहशतवाद आणि धर्मांधता.’ अध्यक्ष : दिलीप पवार
शुक्रवार (ता. ४) ‘विवेकवाद’ विषयावर ज्येष्ठ विचारवंत पी. साईनाथ. अध्यक्ष : उदय नारकर.
शनिवारी (ता. ५) धर्मांधता, अल्पसंख्याक, स्त्रिया’ विषयावर विचारवंत तिस्ता सेटलवाड. अध्यक्ष : प्रा. आशा कुकडे
रविवारी (ता. ६) प्रा. जयदेव डोळे : ‘धर्मांधता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य.’ अध्यक्ष : डॉ. जे. एफ. पाटील.
सोमवारी (ता. ७) ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे ‘धर्मांधतेचे लोकशाही आव्हान.’ अध्यक्ष : डॉ. अशोक चौसाळकर