पानसरे-कलबुर्गी हत्या; साम्यस्थळांची घेतली माहिती

By Admin | Updated: September 4, 2015 00:25 IST2015-09-04T00:25:19+5:302015-09-04T00:25:19+5:30

कर्नाटक पोलिसांकडून चौकशी : कोल्हापुरातील कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते धारवाडमध्ये

Pansare-Kumburgi murder; Sampling Information | पानसरे-कलबुर्गी हत्या; साम्यस्थळांची घेतली माहिती

पानसरे-कलबुर्गी हत्या; साम्यस्थळांची घेतली माहिती

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे व पुरोगामी कन्नड विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येतील साम्यस्थळांची माहिती बुधवारी रात्री कर्नाटकच्या पोलिसांनी घेतली. कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते कलबुर्गी यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी धारवाडला गेले होते. तिथे धारवाडचे पोलीस अधीक्षक आणि तपास अधिकाऱ्यांनी या कार्यकर्त्यांकडे तासभर चौकशी केली. त्यात ‘कम्युनिस्ट’चे दिलीप पोवार, उदय नारकर, एस. बी. पाटील, प्रा. विलास रणसुभे, बाबूराव तारळी व बांधकाम व्यावसायिक चंद्रशेखर तंबाखे यांचा समावेश आहे. पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्येमध्ये साम्यस्थळे आहेत काय याची माहिती घेतली. हे दोघेही एकाच वयाचे होते. मॉर्निंग वॉकवरून परतल्यावर दोघांवर हल्ला झाला. कलबुर्गी यांच्या घरी गेल्यावर मारेकऱ्यांनी दार ठोठावले. त्यावेळी त्यांच्या पत्नी बाहेर आल्या. त्यांना मारेकऱ्यांनी सर आहेत का? असे कन्नडमध्ये विचारले. जसे पानसरे यांना मोरे कुठे राहतात, असे कोल्हापुरी ढंगात विचारले होते. (प्रतिनिधी)

प्रत्यक्षदर्शी पुढे येत नाहीत---पानसरे व कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांना ज्यांनी प्रत्यक्ष पाहिले, असे लोक पोलिसांना नेमकेपणाने माहिती देण्यात पुढे येत नसल्याचा अनुभव दोन्हीकडेही आला. दोन्ही हत्यांनंतर त्याचे सनातनी प्रवृत्तीच्या लोकांकडून समर्थन केले गेले. त्याबद्दल पोलिसांनी काही लोकांना अटकही केली, परंतु चौकशीत फारसे काही निष्पन्न झाले नाही, म्हणून त्यांना सोडून देण्यात आले.

Web Title: Pansare-Kumburgi murder; Sampling Information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.