पानसरे हत्येशीही तावडेचा संबंध
By Admin | Updated: June 12, 2016 01:44 IST2016-06-12T01:44:56+5:302016-06-12T01:44:56+5:30
महत्त्वाचे पुरावे हाती : लवकरच ताबा घेऊन कोल्हापुरात आणणार : संजयकुमार

पानसरे हत्येशीही तावडेचा संबंध
कोल्हापूर : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी ‘सीबीआय’ने अटक केलेला हिंदू जनजागरण समितीचा डॉ. वीरेंद्रसिंग तावडे याचा ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येशी संबंध असल्याचे काही महत्त्वाचे पुरावे हाती आले आहेत. ‘सीबीआय’चा तपास पूर्ण झाल्यानंतर पानसरे हत्येसंबंधी डॉ. तावडे याला ताब्यात घेऊन चौकशी करणार असल्याचे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे (एसआयटी) अप्पर पोलिस महासंचालक संजयकुमार यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पानसरे दाम्पत्य १६ फेब्रुवारी २०१५ रोजी सकाळी फिरायला गेल्यानंतर त्यांच्यावर राहत्या घरापासून काही अंतरावरच हल्लेखोरांनी गोळीबार केला. त्यामध्ये गोविंद पानसरे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी ‘एसआयटी’ पथकाने सांगली येथील ‘सनातन’ संस्थेचा साधक समीर विष्णू गायकवाड याला अटक केली.
गायकवाड याचा दाभोलकर हत्येशी काही संबंध आहे का, यासंबंधी ‘सीबीआय’च्या पथकाने त्याच्याकडे सखोल चौकशी केली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर व डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्यांचा तपास सीबीआय, एसआयटी व सीआयडी (कर्नाटक) या तिन्ही तपास यंत्रणांद्वारे सुरू आहे. उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली हा तपास सुरू आहे.
‘सीबीआय’च्या पथकाने शुक्रवारी (दि. ११) रात्री दाभोलकर हत्याप्रकरणी संशयित डॉ. वीरेंद्रसिंग तावडे याला अटक केल्याने देशभरात खळबळ उडाली.
तावडे याचे आठ वर्षांपूर्वीचे कोल्हापूर कनेक्शन ‘सीबीआय’च्या तपासामध्ये पुढे आल्याने त्याचा पानसरे हत्येशी काही संबंध आहे का, यासंबंधी ‘एसआयटी’चे प्रमुख संजयकुमार यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, ‘‘ डॉ. तावडे याचा पानसरे हत्येशी संबंध असल्याचे काही पुरावे हाती लागले आहेत. डॉ. दाभोलकर, पानसरे व डॉ. कलबुर्गी या तिन्ही हत्यांच्या तपासावर आम्ही तिन्ही तपासयंत्रणा एकत्रितपणे काम करीत आहोत. पानसरे हत्येसंबंधी डॉ. तावडे याच्याकडे स्वतंत्रपणे चौकशी करणार आहोत. प्रसंगी न्यायालयाच्या परवानगीने त्याचा ताबा घेऊन कोल्हापुरात तपासकामासाठी फिरविणात येईल.’’