पानसरेंची हत्या सरकारपुरस्कृत
By Admin | Updated: March 6, 2015 01:18 IST2015-03-06T01:17:52+5:302015-03-06T01:18:12+5:30
कांगो यांचा आरोप : बुधवारी मुंबईत मोर्चा; तपासावर असमाधानी

पानसरेंची हत्या सरकारपुरस्कृत
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते अॅड. गोविंद पानसरे यांचे हल्लेखोर सापडत नसल्याने त्यांचा खून शासनपुरस्कृत असल्याचा समज केवळ ‘भाकप’चा नव्हे तर महाराष्ट्रातील सूज्ञ जनतेचा झाला आहे, असा गंभीर आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते भालचंद्र कांगो यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला. डॉ. नरेंद्र दाभोलकर, अॅड. पानसरे यांच्या खुन्यांना अटक करावी, या मागणीसाठी ११ मार्चला मुंबईत सर्व डावे पक्ष, विविध संघटनांतर्फे भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
कांगो म्हणाले, १६ फेब्रुवारीला अॅड. गोविंद पानसरे, पत्नी उमा पानसरे यांच्यावर गोळीबार झाला. दि. २० फेब्रुवारीला अॅड. पानसरे यांचा मृत्यू झाला.
पानसरे यांचा खून सामाजिक, वैचारिक, राजकीय कारणांतून केला. त्यांच्या हत्येविरोधात संपूर्ण देशातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. केरळमध्ये १२५ ठिकाणी निदर्शने झाली. लातूरमध्ये सलग पंधरा दिवस मोर्चा निघाले. बिहार, झारखंड, दिल्ली, ओरिसा येथे शोकसभा झाल्या.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून निषेध व्यक्त करण्यात आला. आपल्या विरोधात विचार मांडणारे खुपत असल्यामुळे अतिशय नियोजनबद्धपणे हा खून केला. सरकारच्या उन्मादाचे हे द्योतक आहे. पोलीस तपास सुरू असल्याचे सांगत आहेत; परंतु प्रगती दिसत नाही. तपासांतून हाती काही मिळत नसल्यामुळे ‘भाकप’तर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे कुठे जातील तेथे काळे झेंडे दाखविले जात आहेत. काळे झेंडे दाखविणाऱ्या काही कार्यकर्त्यांना पकडून पोलिसांनी दडपशाही सुरू केली आहे. मात्र, जोपर्यंत खुनी शोधून काढत नाहीत तोपर्यंत मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणे बंद होणार नाही.
तपासासंंबंधी भाष्य करताना व्यवस्था ढिसाळ झाल्याची कबुली स्वत: मुख्यमंत्र्यांनी दिली आहे, हे अतिशय गंभीर आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि खुन्यांना त्वरित पकडावे, यासाठी भायखळा राणीच्या बागेपासून बुधवारी(दि. ११) मोर्चाला प्रारंभ होईल. ११ तारखेपर्यंत पोलिसांच्या हाती काही लागले नाही तर त्याच दिवशी बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाईल.
सावळागोंधळ होईल
पानसरेंच्या खुनाची माहिती देणाऱ्यांना शासनाने २५ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. मात्र, बक्षिसाच्या आमिषापोटी नको ते लोक, नको ती माहिती देऊन अपुऱ्या पोलीस यंत्रणेची दिशाभूल करून तपासांत सावळा-गोंधळ निर्माण करतात, असे मत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे आहे, असेही कांगो यांनी सांगितले.