दुरवस्थेच्या गर्तेत पांडवगड

By Admin | Updated: December 10, 2014 23:46 IST2014-12-10T23:09:13+5:302014-12-10T23:46:46+5:30

दुर्गप्रेमींची मागणी : बुरुज, पुरातन मंदिरांची पडझड थांबवा...

Pandavgad in the distant past | दुरवस्थेच्या गर्तेत पांडवगड

दुरवस्थेच्या गर्तेत पांडवगड

पांडुरंग भिलारे -वाई -सह्याद्रीच्या डोंगररांगांमधून अजूनही शिवरायांच्या अतुलनीय पराक्रमाच्या खुणा जिवंत आहेत. शिवशाहीचे साक्षीदार असलेले अनेक किल्ले दिमाखात उभे आहेत. त्यातीलच हा पांडवगड म्हणजे दुरवस्थेच्या गर्तेत सापडलेला किल्ला आहे.
शिवरायांच्या शौर्याची साक्ष देणारे हे प्रेरणास्थळावरील शिवकालीन वास्तूंची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे ‘दुरुनी दिसतो दुर्ग साजिरा...’ अशीच काहीशी अवस्था पाहायला मिळते.
सातारा जिल्ह्यात स्वराज्याची अनेक प्रेरणास्थळे आहेत. त्यातील वाई तालुक्यात चार किल्ले आहेत. त्यापैकी एक म्हणजे पांडवगड. या गडावर आजही शिवकालीन खुणा पाहावयास मिळतात. पांडवगडचा इतिहास पाहिला तर हा शालीवाहन काळातील किल्ला आहे. या किल्ल्याचा आकार चौरस असून तीन बाजूस कातीव कडे आहेत. जणू सह्याद्रीच्या डोक्यावर मानाची टोपी घातल्यासारखे सौंदर्य दिसते. किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून ४२०० फूट आहे. किल्ल्यावर दोन बुरुज, पांडवेश्वर मंदिर, पाण्याची टाकं पाहावयास मिळतात. येथून प्रसिद्ध काळेश्वरी मांढरदेवीचे दर्शन होते.
पांडवगडावरून कमळगड, वैराटगड व धोम धरणाचे विहंगम विलोभनीय दृश्य दिसते. पांडवगड हा मावळ प्रांत व आदिलशाहचे राज्य यांच्या सीमेवर आहे. वाई प्रांत हा समृद्ध समजला जायचा. आदिलशाहकडून शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचा ताबा घेतला व किल्ल्याचा चहूबाजूला टेहळणी करण्यासाठी वापर करण्यात येऊ लागला. कारण येथून पूर्व-पश्चिम भागात टेहळणी करणे सोपे होते. पांडवगडाची ठेवण ही वेगळ्या पद्धतीची आहे.
चढण्यास अवघड आणि उंच असलेल्या या किल्ल्यावरून भोवतालचा परिसर नजरेच्या टप्प्यात येतो. त्यामुळेच या किल्ल्याचा वापर शिवकाळात धान्य, खजिना साठवणुकीसाठीही केला जात असे. किल्ल्यावर जाण्यासाठी पारंपरिक वाटा या खूप अवघड आहेत.
पांडवगडाची रचना अतिशय देखणी पण अवघड आहे. किल्ल्यावर असलेल्या शिवकालीन वास्तंूची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. किल्ल्यावरील बुरुज ढासळले आहेत तर पुरातन मंदिरे भग्नावस्थेत आहेत. किल्ल्यावर झाडे-झुडपे, गवत एवढे वाढले आहे की पर्यटकांना, निसर्गप्रेमींना फिरताना अनेक अडचणी येतात.
गडावरील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी पुण्याचे पर्यटक गडावर फिरायला आले असताना एक पर्यटक पाय घसरून पडल्याने गंभीर जखमी झाला.
सह्याद्रीचा डोंगररांगांमध्ये शिवशाहीतील अनेक गडकोट आहेत. ते सर्वांसाठी प्रेरणास्थळे ठरत आहेत. पांडवगड हा त्यापैकी एक आहे. आपल्या आगळ्यावेगळ्या रचनेमुळे पर्यटकांचा ओढा त्याकडे वाढत आहे. समुद्रसपाटीपासूनची उंची जास्त असल्यामुळे आणि कड्याकपारीचा भाग असल्यामुळे ट्रेकिंगचे साहस अनुभविण्यासाठी ट्रेकिंग कॅम्प, सहलींचे आयोजनही केले जाते.


गडाचा भाग खासगी व्यक्तीला विकला कसा?
या किल्ल्यावरील काही भाग एका व्यक्तीने विकत घेतला असून त्याने हा भाग खासगी मालकीचा असल्याचे फलक जागोजागी लावले आहेत. शिवकालीन गडाची विक्री कशी केली, कोणी केली याबाबत पर्यटकांमध्ये संभ्रमावस्था असून आश्चर्यही व्यक्त होत आहे.

हा किल्ला इतिहासाचा साक्षीदार आहे. गडावर जाणाऱ्या वाटांची डागडुजी केली पाहिजे. याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे येथे वस्तूसंग्रहालय उभारले पाहिजे. तसेच रोप-वेची सोय करावी.
- अ‍ॅड. उमेश सणस, इतिहास अभ्यासक

Web Title: Pandavgad in the distant past

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.