‘वारणा मिनरल्स’च्या खनिज उत्खननाचा पंचनामा

By Admin | Updated: December 24, 2015 00:31 IST2015-12-24T00:26:54+5:302015-12-24T00:31:11+5:30

घटनास्थळी १०० कर्मचारी : उच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर कारवाई, वनखात्याच्या अधिकाऱ्यांची भेट

Panchnama of mineral excavation of 'Varna Minerals' | ‘वारणा मिनरल्स’च्या खनिज उत्खननाचा पंचनामा

‘वारणा मिनरल्स’च्या खनिज उत्खननाचा पंचनामा

मलकापूर : येळवण जुगाई (ता. शाहूवाडी) येथे बेकायदेशीरपणे खनिज उत्खनन करणाऱ्या वारणा मिनरल्स इंडिया प्रायव्हेट लि., वारणानगर या कंपनीमार्फत बॉक्साईट उत्खनन सुरू होते. त्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी उत्खननाचा पंचनामा सुरू केला आहे. घटनास्थळी मलकापूर, शाहूवाडी, पेडांखळे व पन्हाळा येथील वनविभागाचे शंभर कर्मचारी पंचनामा कामात व्यस्त आहेत.
दरम्यान, ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या सविस्तर बातमीची शाहूवाडी तालुक्यात चर्चा सुरू होती. येळवण जुगाईपैकी पांढरेपाणी-पावनखिंड येथे शासनाच्या जमिनीत ‘वारणा माईन्स’ या कंपनीला बॉक्साईट उत्खनन करण्यास परवानगी दिली. मात्र, सुरुवातीपासून ही कंपनी वादग्रस्त ठरली आहे. उत्खनन सुरू असलेली जमीन महसूल व वनखाते यांच्या आखत्यारीत येते. वनखात्याने बॉक्साईट उत्खननाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने उत्खनन व वाहतूक करण्यास स्थगिती दिल्याने कोल्हापूर वनविभागाचे सहायक वनसंरक्षक व्ही. ए. भोसले, विभागीय वनअधिकारी दादासाहेब शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे शंभर वनकर्मचाऱ्यांमार्फत घटनास्थळी उत्खनन केलेल्या मालाचा व वाहनांचा पंचनामा सुरू आहे.
दरम्यान, घटनास्थळी विभागीय वनअधिकारी दादासाहेब शेडगे, सहायक वनसंरक्षक व्ही. ए. भोसले, सहायक वनसंरक्षक उमाकांत क्षीरसागर, वनपरिक्षेत्र अधिकारी विजय गोसावी, विनायक पाटील, वनपाल जे. एन. मदने, विनायक राऊत, संजय कांबळे, अनिल पाटील, साधू कांबळे, के. डी. जामदार, एस. डी. वारके, आदींसह शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यांतील वनपाल, वनमजूर, वनरक्षक उपस्थित होते.

Web Title: Panchnama of mineral excavation of 'Varna Minerals'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.