‘तहसील’च्या कारभाराचा पंचनामा
By Admin | Updated: December 6, 2014 00:33 IST2014-12-05T23:59:09+5:302014-12-06T00:33:08+5:30
चंदगड आमसभा : नागरिकांच्या तक्रारी; गॅस एजन्सी सुरू करणार :

‘तहसील’च्या कारभाराचा पंचनामा
चंदगड : तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांबाबत चंदगड येथील पंचायत समिती सभागृहात झालेल्या आमसभेच्या बैठकीत तहसीलदार आप्पासाहेब समिंदर यांना नागरिकांनी चांगलेच धारेवर धरले. यावेळी तहसील कार्यालयात चाललेल्या भोंगळ कारभाराचा नागरिकांनी पंचनामा केला. सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार संध्यादेवी कुपेकर होत्या.
यावेळी तालुक्यातील प्रलंबित विविध कामांचा आढावा घेण्यात आला. चार-चार महिने दुबार रेशनकार्ड, नाव कमी-जास्त करण्यासाठी दिलेली रेशनकार्ड वेळेवर मिळत नसल्याची तक्रार बाबूराव हळदणकर, मारुती कांबळे, माजी पंचायत समिती सदस्य अशोक पाटील यांनी केली.
यावेळी तहसीलदार समिंधर यांनी नाव कमी-जास्त करायला दिलेली रेशनकार्ड वेळेत मिळतील. शिवाय दुबार रेशनकार्डसाठी कागदपत्रांची सक्ती होणार नसल्याचे सांगितले. जप्त केलेली सिलिंडर परत करून उद्या, शनिवारी कवठेमहांकाळ गॅस एजन्सी सुरू करण्याची ग्वाही दिली.
केरवडे पाटील वाड्यातील नळ पाणी योजनेचे काम ठेकेदाराने अर्धवट टाकून पैसे उचलल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. शेतकऱ्यांनी डांबरी रस्त्यावर पाईपलाईनसाठी चरी खोदल्या आहेत. त्यामुळे अपघात झाल्याची तक्रार चंद्रकांत शिंदे यांनी केली. या शेतकऱ्यांवर कारवाई करावी किंवा चर तरी भरून घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली.
बांधकाम अभियंता व्ही. एस. घाटगे यांनी दोन दिवसांत चरी भरण्याचे आश्वासन दिले. तालुक्यातील बऱ्याच गावात डांबरी रस्ते उखडून गेले आहेत. त्याठिकाणी नवीन रस्ते तरी करावेत किंवा खड्डे भरावेत, अशी मागणी नागरिकांनी केली. ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. सुहास साने हे ग्रामीण रुग्णालयात कमी व खासगी दवाखान्यात जादा वेळ राहतात. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
तुडये प्राथमिक आरोग्य केंद्राला १०८ रुग्णवाहिका मिळावी, अशी मागणी पांडू चव्हाण यांनी केली, तर चंदगड तालुक्यात हत्तींनी धुमाकूळ घातला आहे. एकतर हत्तींना हुसकावून लावा, अन्यथा आम्हाला गावाबाहेर घाला, अशी मागणी नुकसानग्रस्त नागरिकांनी केली. यावर वनक्षेत्रपाल सी. जी. गुजर व एस. बी. तळवडेकर यांनी हत्ती, गवे यापासून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आजपर्यंत ३८ लाखांचे धनादेश वित्ािरत करण्यात आल्याचे सांगितले.
यावेळी डॉ. नंदिनी बाभूळकर, पंचायत समिती सदस्या अनुराधा पाटील, कल्लाप्पा नाईक, जिल्हा परिषद सदस्या सुजाता पाटील, एम. जे. पाटील, आदींसह नागरिक व खातेप्रमुख उपस्थित होते.
गॅस एजन्सी बंद
गेल्या दोन दिवसांपासून विचारपूस न करता तालुक्यात गॅस पुरवठा करणाऱ्या कवठेमहांकाळ गॅस एजन्सीचे गोडावून नसल्याचे कारण दाखवून गॅस एजन्सीच बंद केल्यामुळे ग्राहकांत असंतोष माजला. त्याचे पडसाद आज, बुधवारच्या बैठकीत दिसले.