पंचगंगा पात्राबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:29 IST2021-09-14T04:29:18+5:302021-09-14T04:29:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : जिल्ह्यात गेले दोन दिवस पावसाचा जोर वाढला असून, धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू आहे. ...

पंचगंगा पात्राबाहेर
लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : जिल्ह्यात गेले दोन दिवस पावसाचा जोर वाढला असून, धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू आहे. सोमवारी दुपारी राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले झाल्याने पाण्याचा विसर्ग वाढला आहे. त्यामुळे पंचगंगा नदीचे पाणी बाहेर पडले आहे.
रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. रात्रभर व सोमवारी दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळत राहिल्या. धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू आहे. सगळी धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने मोठा विसर्ग सुरू आहे. ‘राधानगरी’, ‘कासारी’, ‘पाटगाव’, ‘घटप्रभा’, ‘जांबरे‘, ‘कोदे’ या धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत ‘कुंभी’ धरण क्षेत्रात तब्बल १८५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. राधानगरी धरणाच्या दोन स्वयंचलित दरवाज्यांतून प्रतिसेकंद ४२५६ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू होता. दुपारी आणखी दोन दरवाजे खुले झाल्याने ७११२ घनफूट विसर्ग सुरू झाला आहे. दूधगंगा धरणातून ५९००, वारणामधून ५४८२ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भोगावतीसह पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पातळी २९ फुटांवर पोहोचली असून, सोमवारी सायंकाळी पाणी पात्राबाहेर पडले आहे.
नदीकाठच्या शेतकऱ्यांची धाकधूक वाढली
यंदा नदीकाठच्या शेतकऱ्यांचे महापुराने मोठे नुकसान झाले आहे. सर्वच नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले असून, पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून ज्या पद्धतीने पाऊस कोसळत आहे ते पाहता नदीकाठच्या शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. महापुरात उसाच्या आडसाल लागणी गेल्या होत्या. त्यानंतर नव्याने लागणी केल्या असून, त्याही कुजण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.
फोटो ओळी : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, पंचगंगा नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सोमवारी सायंकाळी पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. (फोटो-१३०९२०२१-कोल-रेन) (छाया- नसीर अत्तार)