पंचगंगेची पातळी ३४ फुटांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:17 IST2021-06-20T04:17:36+5:302021-06-20T04:17:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, गगनबावडा तालुक्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. धरणक्षेत्रातही शनिवारी ...

पंचगंगेची पातळी ३४ फुटांवर
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, गगनबावडा तालुक्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. धरणक्षेत्रातही शनिवारी धुवाधार पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. पंचगंगेची पातळी ३४ फुटांवर पोहचली असून, जिल्ह्यातील ५२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.
जिल्ह्यात गेली चार-पाच दिवस जोरदार पाऊस कोसळत आहे. चार दिवसांत सगळीकडे पाणी पाणी केले असून नद्यांना पूर आला आहे. शनिवारी सकाळी पावसाने काहीसी उसंत दिली असली तरी दिवसभरात अधूनमधून जोरदार सरी कोसळल्या. दहा-पंधरा मिनिटे एकसारख्या सरी कोसळत राहतात, सरी इतक्या जोरदार असतात, वाहनचालकांना कसरतच करावी लागते. दोन फुटांवरील समोरचे दिसत नाही. गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी तालुक्यात पावसाचा जोर तुलनेत अधिक राहिला.
धरणक्षेत्रातही धुवाधार पाऊस कोसळत असल्याने धरणातील पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. राधानगरी धरणातून वीजनिर्मितीसाठी प्रतिसेंकद १३०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नद्यांच्या पातळीत वाढ होत असून पंचगंगा ३४ फुटांवर पोहचली आहे. ३९ फूट पंचगंगेची इशारा पातळी आहे.
पंचगंगेच्या पातळीत अर्ध्या फुटाने वाढ
पावसाचा जोर कायम असल्याने ओढे-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. शनिवारी सकाळी आठ वाजता पंचगंगा नदीची पातळी ३३.६ फुटांवर होती. दिवसभरात अर्ध्या फुटाने पातळीत वाढ झाली.
पडझडीत आजरा, शाहूवाडीत नुकसान
पावसाचा जोर असल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. आजरा येथे घर व जनावरांच्या गोठ्यांची तर, पाटणे (ता. शाहूवाडी) येथे घराची भिंत कोसळून सुमारे लाखाचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर गगनबावड्यात जनावरांच्या गोठ्याची भिंत कोसळून म्हैस व लहान रेडकू जखमी झाले आहे.
फोटो ओळी : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून शनिवारी पंचगंगेची पाणीपातळी ३४ फुटांवर पोहचली. त्यामुळे पुराचे पाणी असे विस्तीर्ण पसरले आहे. (फोटो-१९०६२०२१-कोल-रेन ) (छाया- आदित्य वेल्हाळ)