पंचगंगा घाट स्वच्छतेची मोहीम फत्ते
By Admin | Updated: July 8, 2014 01:06 IST2014-07-08T01:03:15+5:302014-07-08T01:06:10+5:30
लोकसहभागातून घाट गाळमुक्त : मंदिरांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी

पंचगंगा घाट स्वच्छतेची मोहीम फत्ते
ंकोल्हापूर : कोल्हापूरचा ऐतिहासिक धार्मिक परंपरांचा वारसा जपलेल्या पंचगंगा घाटाची स्वच्छता मोहीम लोकसहभागातून फत्ते झाली. गेली कित्येक वर्षे गाळात रूतलेल्या समाधी मंदिरांचे सौंदर्य खुलवतानाच घाटाचा परिसर गाळमुक्त करण्याचे महत्त्वाचे कार्य यातून घडले. दरम्यान, आज, सोमवारी सायंकाळी स्वच्छता मोहिमेतील यांत्रिक कामे थांबवण्यात आली.
घाट स्वच्छता मोहिमेत महापालिकेने फारसे स्वारस्य दाखवले नसले तरी लोकसहभागामुळे त्यांनाही काहीअंशी तरी योगदान या मोहिमेत द्यावे लागले. गेल्या सहा दिवसांत जेसीबी, पोकलँड अशा यंत्रांसह शंभरांहून अधिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्थांनी दिलेल्या श्रमदानाचे फलित म्हणून आज पंचगंगा नदीघाट अगदी चकाचक दिसत होता. घाटाच्या सुरुवातीपासून ते ब्रह्मदेवाच्या मंदिरापर्यंतचा घाट गाळमुक्त करण्यात आला. तसेच मंदिरांभोवतीचा कचराही काढण्यात आला, त्यामुळे नदीघाटाचे रूप अजूनच खुलून दिसत होते.