पंचगंगा १७ तर, कृष्णेची पातळी १४ फुटांने वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:17 IST2021-06-19T04:17:20+5:302021-06-19T04:17:20+5:30
शिरोळ / उदगाव / बुबनाळ : कोल्हापूर जिल्ह्यात कोसळलेल्या पावसामुळे शिरोळ तालुक्यातील नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. शुक्रवारी ...

पंचगंगा १७ तर, कृष्णेची पातळी १४ फुटांने वाढली
शिरोळ / उदगाव / बुबनाळ : कोल्हापूर जिल्ह्यात कोसळलेल्या पावसामुळे शिरोळ तालुक्यातील नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. शुक्रवारी पंचगंगा १७ तर, कृष्णेच्या पाणीपातळीत १४ फुटांने वाढ झाली आहे. झपाट्याने पाणीपातळीत वाढ झाल्याने नदीकाठची शेती पाण्याखाली गेली आहे. तर जुना औरवाड पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद केली. पंचगंगेची पातळी वाढल्याने शिरढोण-कुरुंदवाड मार्गावरील वाहतूक बंद केली आहे.
गेले चार दिवस संततधार पावसामुळे तालुक्यातील कृष्णेसह पंचगंगा, दूधगंगा, वारणा या नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. शुक्रवारी पंचगंगेची पातळी कुरुंदवाड यादव पुलावर ४६ फूट, तेरवाड बंधाऱ्यावर ५२, शिरोळ बंधाऱ्यावर ४७ फूट होती. तर कृष्णेची पातळी अंकली पुलावर २५.७ फूट होती. दिवसभर पावसाची उघडझाप सुरूच होती. औरवाड-नृसिंहवाडी जुन्या पुलावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तर तेरवाड, शिरोळ, राजापूर हे बंधारे यापूर्वीच पाण्याखाली गेले आहेत.
फोटो - १८०६२०२१-जेएवाय-०९, १० फोटो ओळ - ०९) कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने औरवाड-नृसिंहवाडी जुना पूल पाण्याखाली गेला आहे. (छाया-रमेश सुतार, बुबनाळ) १०) उदगाव (ता. शिरोळ) येथील कृष्णेच्या पाणीपात्रात मोठी वाढ झाली आहे. (छाया-अजित चौगुले, उदगाव)