शिरोळमध्ये पंचगंगा पुन्हा पात्राबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 00:43 IST2019-09-06T00:43:00+5:302019-09-06T00:43:04+5:30
शिरोळ / कुरुंदवाड : गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाल्याने व धरण क्षेत्रातील पाण्याच्या विसर्गाने पंचगंगा नदी ...

शिरोळमध्ये पंचगंगा पुन्हा पात्राबाहेर
शिरोळ / कुरुंदवाड : गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाल्याने व धरण क्षेत्रातील पाण्याच्या विसर्गाने पंचगंगा नदी पुन्हा पात्राबाहेर पडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी पुन्हा धास्ती घेतली आहे.
शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता नृसिंहवाडी येथे कृष्णेची पाणी पातळी ४० फूट, राजापूर बंधाऱ्यावर २५.३ फूट, अंकली पुलाजवळ २३.८ फूट होती तर शिरोळ बंधाºयावर पंचगंगेची पाणी पातळी ३८.९ फूट, तेरवाड बंधाºयावर ४९ फूट होती.
गतमहिन्यात महापुराने धुमाकूळ घातल्याने शेती, घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. पशुधन वाहून गेल्याने शेतकऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनला आहे. महापूर ओसरून जनजीवन सुरळीत होत असतात. गेल्या दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात पुन्हा पाऊस सुरु झाला आहे. त्यामुळे पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर पडले आहे. तेरवाड, शिरोळ बंधारा यापूर्वीच पाण्याखाली गेला आहे. कुरुंदवाड-जुना शिरोळ रस्त्यावरील अनवडी पूल पाण्याखाली गेला. कृष्णा नदीवरील राजापूर बंधारा पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.
पन्हाळा परिसरात पुन्हा संततधार
पन्हाळा : काही काळ विश्रांती घेतल्यानंतर पन्हाळा तालुक्यात गुरुवारी संध्याकाळी पावसाची पुन्हा संततधार सुरू झाली. गुरुवारी घरोघरी गौरींचे आगमन होणार आहे. त्यात पावसाचा जोर कायम असल्याने सणाच्या उत्साहावर विरजण पडले आहे. अतिवृष्टीमुळे मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाºया भाज्याही मिळत नाहीत, अशी स्थिती आहे. पन्हाळा तालुक्यातील कुंभी, जांभळी, कासारी, धामणी आणि वारणा नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले असून, पाऊस थांबला नाही तर अनेक बंधारे पुन्हा पाण्याखाली जाण्याची भीती आहे. गुरुवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत पन्हाळ्यावर २७ मिमी, तर बाजारभोगाव येथे सगळ्यात जास्त ५४ मिमी पावसाची नोंद झाली.
कासारी खोºयात पावसाचा जोर
अणूस्कुरा : कासारी खोºयात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून, पाल बंधाºयावर पाणी आल्याने पाल, इजोली, सावर्डी, मरळे, बर्की गावांचा संपर्क तुटला आहे. करंजफेण परिसरात गेले तीन दिवस पावसाचा जोर सुरू आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुपारनंतर करंजफेण ते पालदरम्यान बंधाºयावर पाणी आल्याने नदीपलीकडच्या नागरिकांची तारांबळ उडाली. बर्की येथील बंधाºयावर पाणी आल्याने धबधब्याकडे जाणारे पर्यटकही मागे परतल. तर दुपारनंतर परिसरांतील शाळांना सुटी दिली. दरम्यान, गेल्या महापुराचा अनुभव ताजा असल्याने नागरिक आताच जीवनावश्यक वस्तूंची जुळवाजुळव करत आहेत.