पंचगंगा प्रदूषण ‘जैसे थे’ : प्रदूषण मंडळाचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र
By Admin | Updated: January 20, 2015 00:52 IST2015-01-20T00:46:47+5:302015-01-20T00:52:15+5:30
नदीकाठचे रडारवर : महापालिका, इचलकरंजी नगरपालिकेवर ठपका; ‘भोगावती’ला नोटीस

पंचगंगा प्रदूषण ‘जैसे थे’ : प्रदूषण मंडळाचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र
कोल्हापूर : महापालिकेने कसबा बावड्यातील ७६ दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे केंद्र अद्याप कार्यान्वितच केलेले नाही, तर दुधाळी केंद्राची अद्याप उभारणीच झालेली नाही. इचलकरंजी नगरपालिकेचीही तीच अवस्था. यामुळे पंचगंगा प्रदूषण रोखण्यात स्थानिक स्वराज्य संस्था सपशेल फेल ठरल्याचे ‘एमपीसीबी’ (महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ)ने आज, सोमवारी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक व अजय गडकरी यांच्या खंडपीठापुढे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले. पंचगंगा प्रदूषणप्रश्नी दाखल एकत्रित जनहित याचिकेसंदर्भात मंडळाने हे प्रतिज्ञापत्र सादर केल्याची माहिती याचिकाकर्त्यांचे वकील धैर्यशील सुतार यांनी ‘लोकमत’ला दिली. मनपाचे एसटीपी केंद्र कार्यान्वित नाही, असे अधिकारी मनीष होळकर यांनी आज प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितले. मनपावर कारवाईची मागणी करणार असल्याचे अॅड. सुतार यांनी स्पष्ट केले. ‘एमआयडीसी’ने कागल-हातकणंगले येथे सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया केली जात नसल्याने ५० टक्के पाण्याची कपात करावी, असे आदेश ‘एमआयडीसी’ला दिले. भोगावती कारखान्याची एस. एस. डिस्टीलरी बंद का करू नये, अशी नोटीस बजावल्याचे मंडळाने न्यायालयास सांगितले.