रंकाळ्याचे दुखणे कायम
By Admin | Updated: August 9, 2014 00:27 IST2014-08-09T00:22:36+5:302014-08-09T00:27:59+5:30
ठोस उपाययोजना नाहीत : सांडपाणी रोखण्यात यश; पण तटबंदीचे ढासळणे सुरूच

रंकाळ्याचे दुखणे कायम
संतोष पाटील - कोल्हापूर - राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेतून रंकाळा प्रदूषणमुक्तीसाठी पहिल्या टप्प्यात ८.६६ कोटींचा निधी आला. त्यातील बहुतांश कामे अपूर्ण असताना दुसऱ्या टप्प्यातील १०० कोटींच्या निधीचे वेध महापालिकेला लागले आहेत. मुंबईतील एन.जे.एस. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी रंकाळा परिसराची पाहणी करून आवश्यक कामांची यादीही तयार केली. केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांनी ठोस उपाय योजण्याची केलेली घोषणा हवेतच विरली. निधी व घोषणांचा पाऊस पडत असताना रंकाळ्याची दुर्दशा मात्र आहे तशीच आहे.
संवर्धन योजनेतून पहिल्या टप्प्यात रंकाळ्यासाठी आलेल्या निधीतून साडेचार कोटी रुपयांची तांबट कमान ते रंकाळा टॉवर पाईपलाईन टाकण्याचे काम गेली चार वर्षे सुरू आहे. निसर्गकेंद्र प्राथमिक अवस्थेत आहे. गाळ काढण्यासाठी प्रभावी यंत्रणा राबविली गेली नाही. रंकाळ्यात शाम सोसायटी, देशमुख कॉलनी, सरनाईक कॉलनी, आदी नाल्यांतून मिसळणारे सांडपाणी पंधरा दिवसांपूर्वी रोखण्यात महापालिकेला यश आले आहे. अद्याप दीड ते दोन एमएलडी सांडपाणी रंकाळ्यात मिसळते.
केंदाळ काढणे, निर्माल्य कुंडाचे बांधकाम, ओव्हरफ्लो कमान, आदी कामे वगळता एकही भरीव काम पहिल्या टप्प्यात झालेले नाही. साडेआठ कोटी रुपये खर्च करूनही रंकाळ्याच्या दुखण्यात कणभरही फरक पडलेला नाही. सांडपाणी बंद झाल्याचे दृश्य परिणाम समोर येण्यास किमान दोन वर्षांचा कालावधी आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित ड्रेनेज लाईन टाकणे, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, संरक्षक कठड्यांची उंची वाढविणे, गाळ काढणे किंवा स्थूल ठेवण्यासाठी उपाययोजना, निर्गत पाण्याच्या व्हॉल्व्हची दुरुस्ती, पदपथ, सांडपाणी पूर्णपणे रोखणे, आदींसाठी राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेतून तब्बल १०० कोटींचा निधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
निधी उपलब्ध होऊन प्रत्यक्ष कामास सुरू होईल तेव्हा होईल. मात्र, सध्या रंकाळ्याला आलेली अवकळा शहरवासीयांना व्यथित करणारी आहे.