भात रोप लावणीचे काम अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:16 IST2021-07-22T04:16:34+5:302021-07-22T04:16:34+5:30
सदाशिव मोरे आजरा : समाधानकारक पाऊस व अनुकूल हवामान यामुळे आजरा तालुक्यातील खरीप हंगामातील पिकांची चांगली वाढ झाली आहे. ...

भात रोप लावणीचे काम अंतिम टप्प्यात
सदाशिव मोरे
आजरा : समाधानकारक पाऊस व अनुकूल हवामान यामुळे आजरा तालुक्यातील खरीप हंगामातील पिकांची चांगली वाढ झाली आहे. भात रोप लावणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. घनसाळ भात, सोयाबीन व ऊस क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. चीनचा काळा राईस या औषधी भाताची २० एकरवर लागवड करणेत आली आहे.
शेतीच्या मशागतीसाठी मे महिन्यात वळिवाचा चांगला पाऊस झाला. त्यानंतर जूनमध्ये पडलेल्या पावसाने पेरणी व टोकणणीची कामे १०० टक्के पूर्ण झाली आहेत. पिकांच्या वाढीसाठी मुबलक व पाहिजे त्या वेळी पाऊस झाल्यामुळे पिके जोमात आहेत. मात्र, पावसाअभावी भात रोप लावणीची कामे खोळंबली होती. ती गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुन्हा गतीने सुरू आहेत.
बैलांची संख्या कमी झाल्याने यांत्रिकी पद्धतीने चिखल करून भात रोप लावणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. आजरा साखर कारखाना सुरू होणार व आंबेओहोळ प्रकल्पात पाणीसाठा झाल्याने उसाचे क्षेत्र वाढले आहे.
चौकट :
आजरा तालुक्यातील पीक परिस्थिती :
भात - ९७०० हे. (घनसाळ भात - २०० हे., सेंद्रिय घनसाळ १० हे., काळा राईस - २० एकर, काळा जिरगा - २५ एक्कर) ऊस - ४५७८ हे., सोयाबीन - ८०० हे., भुईमूग - ३२५० हे., नाचणा - ३५००हे.
चौकट : पीकविम्यासाठी शेतकऱ्यांचा प्रतिसाद
आजरा तालुक्यातील १५० शेतकऱ्यांनी ३५ हेक्टरचा पीकविमा घेतला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने भात, नाचणा, भुईमूग, सोयाबीन या पिकांचा समावेश आहे. अजूनही शेतकऱ्यांकडून पीकविमा घेतला जात आहे.
चौकट : चित्रीत ७३ तर आंबेओहोळमध्ये ५७ टक्के पाणीसाठा
आजरा व गडहिंग्लज तालुक्याला वरदान ठरलेल्या चित्री प्रकल्पात १३६७ द.ल.घ.फू. पाणीसाठा झाला आहे. चालूवर्षी पाणीसाठा केल्या जाणाऱ्या आंबेओहोळ प्रकल्पात ६९५ दलघफू म्हणजे ५६ टक्के पाणीसाठा झाला आहे. चित्री परिसरात १२०१ मि.मी. तर आंबेओहोळ परिसरात आजपर्यंत ६४७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
फोटो ओळी : आजरा तालुक्यातील किटवडे परिसरात सुरू असलेली भात रोप लावण.
क्रमांक : २१०७२०२१-गड-०३