‘पीएसीएल’चे दहा हजार गुंतवणूकदार हवालदिल
By Admin | Updated: August 25, 2014 00:20 IST2014-08-25T00:17:57+5:302014-08-25T00:20:43+5:30
जिल्ह्यातील स्थिती; दूरध्वनी, प्रत्यक्ष भेटून विचारणा

‘पीएसीएल’चे दहा हजार गुंतवणूकदार हवालदिल
कोल्हापूर : पीएसीएल लिमिटेड (पल्स) राबवत असलेली कलेक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट स्कीम (सीआयएस) ताबडतोब बंद करावी. तसेच तब्बल ४९ हजार १०० कोटी रुपये गुंतवणूकदारांना तीन महिन्यांत परत देण्याचे आदेश सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडियाने (सेबी) ‘पीएसीएल’ला दिले आहेत. ते समजताच कोल्हापुरातील ‘पीएसीएल’चे सुमारे दहा हजार गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. त्यातील काही जणांनी आज, रविवारी कंपनी कार्यालयात दूरध्वनीवरून, प्रत्यक्ष भेटून याबाबत विचारणा केली.
गेल्या २१ वर्षांपासून कोल्हापुरात पीएसीएल कार्यरत आहे. या ठिकाणी कंपनीच्या विविध योजनांमध्ये सुमारे दहा हजार जणांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यासह फिल्ड असोसिएट आणि एजंट म्हणून येथील अनेकजण या कंपनीत कार्यरत आहेत. ‘सेबी’च्या आदेशाची माहिती वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांद्वारे समजताच कोल्हापुरातील ‘पीएसीएल’चे गुंतवणूकदार हवालदिल झाले. त्यातील काहीजणांनी त्यांच्याशी संबंधित असलेले कंपनीचे फिल्ड असोसिएट, एजंटांची घरे गाठली. काहींनी कोल्हापुरातील स्टेशन रोडवरील कंपनीच्या कार्यालयात प्रत्यक्ष भेटून माहिती घेतली.
पैसा बुडविणार नाही
लोकमत’ने ‘पीएसीएल’चे कोल्हापूर शाखेचे व्यवस्थापक अमित शर्मा यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, कोल्हापुरात १९९६ पासून कंपनी कार्यरत आहे. सुरुवातीला गुंतवणूक केलेल्यांचे पैसे त्यांना मिळणाऱ्या लाभासहीत परत केले आहेत. उर्वरित गुंतवणूकदारांना देखील पैसे दिले जातील. कोणत्याही गुंतवणूकदाराचा एकही पैसा बुडविणार नाही. कंपनी आणि ‘सेबी’ यांच्यात १९९९ पासून न्यायालयीन लढा सुरू आहे. जयपूर (राजस्थान)मधील न्यायालयातील लढा कंपनीने जिंकला. त्यावर
‘सेबी’ सर्वोच्च न्यायालयात गेली. ‘सेबी’ने दिलेल्या या आदेशामुळे कंपनीचे फिल्ड असोसिएट आणि एजंटांची फळी मात्र विस्कळीत होणार आहे.