पाचाकटेवाडीकरांना पाण्यासाठी डोंगरातील झऱ्याचाच आधार
By Admin | Updated: June 3, 2015 01:00 IST2015-06-03T00:36:57+5:302015-06-03T01:00:32+5:30
पाणीप्रश्न गंभीर : गावगाडा चालविणाऱ्याचा मात्र ग्रामस्थांना पाणीप्रश्न मिटविण्यासाठी भूलथापा; एक घागर पाणी चार रुपयाला

पाचाकटेवाडीकरांना पाण्यासाठी डोंगरातील झऱ्याचाच आधार
प्रकाश पाटील -कोपार्डे --जिल्ह्याच्या पश्चिमेला असणाऱ्या १२ वाड्यांपैकी एक पाचाकटेवाडीमध्ये पाणीप्रश्न गंभीर बनला असून, पाण्यासाठी रोजगार सोडून महिलांना पायपीट करावी लागत आहे. डोंगरावरील झऱ्याचे पाणी न मिळाल्यास घागरीला चार रुपये मोजून पाणी विकत घ्यावे लागत आहे. समृद्ध असणाऱ्या जिल्ह्यात ही शोकांतिका म्हणावी लागेल.
पासार्डेपैकी पाचाकटेवाडी (ता. करवीर) सुमारे १५०० लोकवस्तीचे डोंगरीवाडी. येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी डोंगरातील पाण्याच्या झऱ्याचा आधार घ्यावा लागत आहे. स्वातंत्र्याची पहाट होऊन अर्धशतक झाले तरी पाणीप्रश्न सोडविण्यासाठी ना लोकप्रतिनिधी, ना प्रशासनाला स्वारस्य असल्याचे दिसत आहे.
गेल्यावर्षी २२ लाखांची नवीन पेयजल योजना मंजूर झाली. मुख्य पाईपलाईनचे काम झाले. ज्या झऱ्याला पाणी चांगल्या प्रमाणात आहे तेथे चेंबर बांधला गेलेलाच नाही. ज्या ठिकाणी चेंबर बांधला आहे व सायफन पद्धतीला पाईप टाकली आहे ती चुकीच्या ठिकाणी असल्याच्या ग्रामस्थांनी तक्रारी मांडल्या. जुन्या नळयोजनेतून पाण्याच्या टाकीत काही प्रमाणात पाणी साठते. हे पाणी चार दिवसांतून येते. तेही पूर्ण क्षमतेने मिळत नाही. केवळ चार घागरी पाण्यावर चार दिवस एकेका कुटुंबाला तहान भागवावी लागत आहे.
शेतीची कामे व रोजगार बाजूला ठेवून पुरुष मंडळी, तर स्त्रियांना घरकामापेक्षा पाण्याला महत्त्व द्यावे लागत आहे. डोंगर उतारावरून चार कि. मी. खाली पासार्डेतील शेतकरी रणधीर मोरे यांच्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी ग्रामस्थ व महिला येतात.
जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असताना नागरिक २५० रुपये देऊन एक हजार लिटर पाणी आरडेवाडी व पासार्डेतून विकत आणत आहेत. नवीन नळपाणी योजना त्वरित पूर्ण करून पाणीप्रश्न मार्गी लावावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
पाणीप्रश्न गंभीर बनल्याने जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पुंडलिक पाटील, सुनील पाटील यांनी पाणीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. मात्र, ते केवळ आश्वासनच ठरले.
दरम्यान, उप ठेकेदार संभाजी पाचाकटे यांनी योजनेचे पाणी चेंबर बांधण्यासाठी थांबविले आहे. येत्या आठ दिवसांत ग्रामस्थांना पाणी देऊ, असे आश्वासन दिले आहे.
दुसरीकडे चेंबरचे ठिकाण निश्चित करून पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण झाले तर योग्य होईल, अन्यथा काम लांबणीवर पडणार आहे.
लोकसहभागाशिवाय विकास नाही. ग्रामस्थांनी पाणी योजनेच्या कामात लक्ष घालावे. पुन्हा पुन्हा योजना मिळत नाहीत. योग्य ठिकाणी चेंबर व्हावा यासाठी पाठपुरावा करू
- राजेंद्र सूर्यवंशी,
पंचायत समितीचे सदस्य