अकरावीच्या ‘ सीईटी ’ला अर्ज करण्याची गती वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:25 IST2021-07-28T04:25:37+5:302021-07-28T04:25:37+5:30
कोल्हापूर : संकेतस्थळ बाबतची तांत्रिक अडचण दूर झाल्याने इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठीच्या सामाईक प्रवेश परीक्षेला (सीईटी) ऑनलाईन अर्ज करण्याची गती ...

अकरावीच्या ‘ सीईटी ’ला अर्ज करण्याची गती वाढली
कोल्हापूर : संकेतस्थळ बाबतची तांत्रिक अडचण दूर झाल्याने इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठीच्या सामाईक प्रवेश परीक्षेला (सीईटी) ऑनलाईन अर्ज करण्याची गती वाढली आहे. जिल्ह्यातील शासकीय, अनुदानित आणि खासगी तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) मधील प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मंगळवारपर्यंत एकूण २,९०० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ‘ आयटीआय ’ प्रवेशाच्या सविस्तर वेळापत्रकाची दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रतीक्षा लागली आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून तांत्रिक अडचण दूर झाली. त्यामुळे ‘ सीईटी ’ ला अर्ज करण्याची गती वाढली आहे. त्यातच कोल्हापूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाने चांगली उघडीप दिल्याने विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला आहे. जिल्ह्यात वीस पॉलिटेक्निक आहेत. तेथील प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. आतापर्यंत २,९०० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले असून त्यापैकी १,९०० जणांनी अर्ज निश्चितीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. अर्ज करण्याची मुदत शुक्रवार (दि. ३०) पर्यंत आहे. ही मुदत वाढण्याची शक्यता पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेचे कोल्हापूर जिल्ह्याचे नोडल ऑफिसर प्राचार्य प्रशांत पट्टलवार यांनी सांगितले. जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी आयटीआयमधील प्रवेशासाठी मंगळवारपर्यंत एकूण १,९२२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यातील १,६७१ जणांनी अर्जाची निश्चिती केली आहे. विद्यार्थ्यांनी आयटीआयच्या प्रवेश प्रक्रियेच्या सविस्तर वेळापत्रकाची प्रतीक्षा लागली आहे.
चौकट
बारावीच्या निकालाची तयारी अंतिम टप्प्यात
कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी बारावीच्या निकालासाठी अंतर्गत गुणांची माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उपलब्ध करून दिलेल्या संगणक प्रणालीमध्ये भरली आहे. सध्या विभागीय शिक्षण मंडळाच्या पातळीवर अहवाल तयार करण्याचे अंतिम टप्प्यातील काम सुरू आहे.
फोटो (२७०७२०२१-कोल-सीईटी एक्झाम) : इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठीच्या ‘सीईटी’ साठी ऑनलाईन अर्ज करण्यातील तांत्रिक अडचण दूर झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरातील विविध नेटकॅफेमध्ये अर्ज करण्यास दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे.