महापालिकेच्या नूतन आयुक्तपदी पी. शिवशंकर
By Admin | Updated: January 14, 2015 01:24 IST2015-01-14T01:20:53+5:302015-01-14T01:24:30+5:30
शनिवारी रुजू होणार : स्वच्छ व्यवहारास प्राधान्य देणार

महापालिकेच्या नूतन आयुक्तपदी पी. शिवशंकर
कोल्हापूर : महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून गडचिरोलीचे साहाय्यक जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांची राज्य शासनाने आज नियुक्ती केली. मावळत्या आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांची कर्नाटक येथील स्टाफ सिलेक्शन कमिटी (राज्यस्तरीय निवड समिती)च्या प्रादेशिक संचालकपदी पंधरा दिवसांपूर्वी बदली झाली आहे. पी. शिवशंकर हे शनिवारी (दि.१७) येथे कार्यभार स्वीकारणार आहेत. काम कोणतेही असो, स्वच्छ व्यवहारास आपले प्राधान्य राहील, अशी ग्वाही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. महापालिका आयुक्त म्हणून ते पहिल्यांदाच ही जबाबदारी स्वीकारत आहेत.
पी. शिवशंकर यांची आयुक्तपदी नियुक्ती झाल्याचा आदेश रात्री उशिरा महापालिकेस मिळाला. मूळचे अनंतपूर (आंध्रप्रदेश) चे असलेले पी. शिवशंकर हे २०११ ला भारतीय प्रशासन सेवेत दाखल झाले. वर्धा जिल्ह्यात प्रांताधिकारी म्हणून काम करताना बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई केल्याने ते चर्चेत आले. आॅगस्ट २०१३ मध्ये त्यांची बदली गडचिरोलीस साहाय्यक जिल्हाधिकारी (म्हणून झाली. त्यांच्याकडे एकात्मिक आदिवासी प्रकल्पाचा अतिरिक्त कार्यभार होता. वस्ती शाळामध्ये त्यांनी बायोमेट्रिक हजेरीची पध्दत सुरु केली. त्याचा परिणाम अतिशय चांगला झाला. त्यामुळे शाळांची गुणवत्ता सुधारली. नुकताच त्यांनी आदिवासी विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीतील घोटाळा उघडकीस आणला आहे. साहाय्यक जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी कामाची वेगळी छाप पाडली. खेडोपाडी फिरून लोकांच्या अडीअडचणी समजून घेण्यात त्यांना पुढाकार घेतला. स्वच्छ प्रतिमेचा अधिकारी अशी त्यांची यापूर्वीच्या सेवेतील ओळख आहे.
‘कोल्हापूरसारख्या महापालिकेत काम करण्याची संधी मिळाली याचा नक्कीच आनंद आहे. महापालिकेची उपलब्ध यंत्रणा वापरून नागरिकांना चांगल्या सोयी-सुविधा देण्यास आपले प्राधान्य राहील. टोलचा प्रश्न, पंचगंगा प्रदूषणासह, शहराची दैनंदिन स्वच्छता हे मुद्देही महत्त्वाचे आहेत. शुक्रवारी किंवा शनिवारी कार्यभार स्वीकारणार आहे.
- पी शिवशंकर, नवे महापालिका आयुक्त