‘पी. एन.-चंद्रकांतदादा’ युतीचे गौडबंगाल काय?
By Admin | Updated: May 22, 2015 00:55 IST2015-05-22T00:53:21+5:302015-05-22T00:55:58+5:30
दादा सज्जन आणि सरळ

‘पी. एन.-चंद्रकांतदादा’ युतीचे गौडबंगाल काय?
कोल्हापूर : केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यात हाडवैर असताना कोल्हापुरात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व पी. एन. पाटील यांच्यात युती कशी; यामागील गौडबंगाल काय, अशी विचारणा जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केली. राष्ट्रवादी काँग्रेसवर पालकमंत्र्यांचा एवढा राग का? याबाबत त्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आमदार मुश्रीफ म्हणाले, काही करून राष्ट्रवादी काँग्रेसचा पर्यायाने हसन मुश्रीफ यांना जिल्हा बँकेचा अध्यक्ष होऊ द्यायचा नाही. यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी फिल्डिंग लावली होती. त्यांनी काही संचालकांना फोन करून माझ्या विरोधात जाऊन पी. एन. पाटील यांना साथ देण्यास सांगितले होते. त्यांच्या या भूमिकेबद्दल मला आश्चर्य वाटते, नेमके आमचे काय चुकले हेच कळत नाही. केंद्रात नरेंद्र मोदी व राहुल गांधी यांच्या संघर्ष सुरू असताना कोल्हापुरात चंद्रकांतदादा पाटील व पी. एन. पाटील यांची युती कशी? राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष होऊ नये, याची चंद्रकांतदादांना काळजी का? असा सवालही त्यांनी केला.
दादा सज्जन आणि सरळ
जिल्हा बँकेच्या माजी संचालकांची ‘कलम ८८’ नुसार पुन्हा चौकशी करण्याचा इशारा सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला आहे. याबाबत विचारले असता, चंद्रकांतदादा सज्जन आणि सरळ माणूस आहेत. त्यांच्या या विधानाचा आम्हाला न्यायालयात उपयोग होईल, कदाचित आम्हाला फायदा व्हावा, यासाठीच ते असे बोलले असतील, असा टोला आमदार मुश्रीफ यांनी हाणला.
राजू शेट्टींना आवतण
नार्कोे टेस्ट करा, म्हणून यापूर्वीच सांगितले आहे. आता बँक आमच्या हातात आहे. त्यांनी येऊन कारभार बघावा, त्यांना निमंत्रित करतो, असे सांगत आपण ‘भाबडा’ आहे, हे सांगण्यासही आमदार मुश्रीफ विसरले नाहीत.
...तर भाजपला झळा कळाल्या असत्या
भाजपने कोल्हापूरऐवजी विदर्भ, मराठवाड्यात अधिवेशन घेतले असते तर त्यांना तेथील उष्णता व दुष्काळाच्या झळा कळल्या असत्या. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना मुख्यमंत्री मात्र सहा महिन्यांत तीन महिने विदेश दौऱ्यावरच, असल्याची टीका मुश्रीफ यांनी केली.
हसन मुश्रीफ यांची विचारणा
राष्ट्रवादीवरील रागाबाबत पालकमंत्र्यांची भेट घेणार