घोडावत कोविड सेंटरचा ऑक्सिजन पुरवठा थांबला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:31 IST2021-07-07T04:31:37+5:302021-07-07T04:31:37+5:30
हातकणंगले : घोडावत कोविड सेंटरला ऑक्सिजन पुरवणाऱ्या कंपनीचे बिल जिल्हा परिषद प्रशासनाकडून रखडल्याने या कंपनीने ऑक्सिजनचा पुरवठाच थांबविल्यामुळे कोरोना ...

घोडावत कोविड सेंटरचा ऑक्सिजन पुरवठा थांबला
हातकणंगले : घोडावत कोविड सेंटरला ऑक्सिजन पुरवणाऱ्या कंपनीचे बिल जिल्हा परिषद प्रशासनाकडून रखडल्याने या कंपनीने ऑक्सिजनचा पुरवठाच थांबविल्यामुळे कोरोना रुग्णाच्या नातेवाईकाची एकच धावपळ उडाली. रुग्णांना दुसरीकडे हलविण्याचा सल्ला या कोविड सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी दिल्याने एकच खळबळ उडाली. अखेर ज्येष्ठ जि. प. सद्स्य अरुण इंगवले, प्रसाद खोबरे आणि माजी सभापती राजेश पाटील यांनी जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांना धारेवर धरून ऑक्सिजन पुरवठा कंपनीला बिलाचा चेक दिल्याने पुरवठा सुरळीत झाला आणि रुग्णाच्या नातेवाईकाची धावाधाव शांत झाली.
अतिग्रे येथील घोडावत कोविड सेंटरला ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपनीचे बिल गेली आठ दिवस आज-उद्या करत पुढे ढकलण्याचे काम जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून सुरू होते. अखेर कंपनीने या सेंटरचा ऑक्सिजन पुरवठा मंगळवारी दुपारी १२ वा. थांबविला ऑक्सिजन नसल्याने रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकाना कोविड सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी ऑक्सिजन नसल्याने पेंशटला दुसरीकडे हलविण्याचा सल्ला दिला. नातेवाईक भांबावून गेले. ऑक्सिजन बेडसाठी फोनाफोनी सुरू झाली. नातेवाईकाचा गोंधळ उडाला आणि ऑक्सिजनअभावी रुग्णाचे जीव टांगणीला लागल्याची माहिती जि. प. सदस्य अरुण इंगवले, प्रसाद खोबरे, पंचायत समितीचे माजी सभापती राजेश पाटील यांच्यापर्यंत पोहचली आणि जिल्हा परिषद प्रशासनाला जाग आली. अरुण इंगवले यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे यांना तत्काळ बोलावून घेऊन घटनेची माहिती दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्याबरोबर या तीन सदस्यांनी मोबाईलवर संपर्क करून त्यांना चांगलेच धारेवर धरले. ऑक्सिजनअभावी रुग्णाचे जीव धोक्यात आहेत. गाभीर्यांने घ्या नाहीतर अनर्थ घडेल, असे सांगितल्यामुळे या कंपनीचे रखडलेल्या बिलाची रक्कम हातकणंगले गटविकास अधिकारी यांच्याकडे तत्काळ वर्ग केली आणि कोविड सेंटरचा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत झाला. रुग्णाच्या नातेवाईकांची धावाधाव थांबली.