‘आयआरबी’च्या कर्मचाऱ्यांकडून वाहनधारकास मारहाण

By Admin | Updated: July 3, 2014 01:13 IST2014-07-03T01:07:07+5:302014-07-03T01:13:59+5:30

शाहू टोलनाक्यावरील प्रकार : तिघांविरोधात गुन्हा; घटनेनंतर सर्व नाक्यांवरील पोलीस बंदोबस्त वाढविला

The owner of the IRB staff beat the driver | ‘आयआरबी’च्या कर्मचाऱ्यांकडून वाहनधारकास मारहाण

‘आयआरबी’च्या कर्मचाऱ्यांकडून वाहनधारकास मारहाण

कोल्हापूर : टोल देण्यास नकार देणाऱ्या वाहनधारकास शाहू टोलनाक्यावरील आयआरबीच्या तिघा कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली. यामध्ये किरण विठ्ठल पोळ (वय ४५, रा. निपाणी, ता. चिकोडी, जि. बेळगाव) हे जखमी झाले. या घटनेनंतर शहरातील नऊही टोलनाक्यांवर तातडीने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला.
किरण पोळ हे निपाणीहून आपल्या चारचाकीतून (क्र. केए २२ एम १९६९) कोल्हापूरला येत होते. सकाळी साडेअकराच्या सुमारास ते शाहू टोलनाक्यावर आले असता आयआरबी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वीस रुपये टोल भरा, असे सांगितले. त्यावर त्यांनी टोलविरोधात आंदोलन सुरू असून ‘टोल देणार नाही’, असे त्यांना सांगितले.
यावेळी कर्मचाऱ्यांनी टोल द्यावाच लागेल असे त्यांना सुनावले; मात्र टोल देणार नाही असा ठणकावून सांगत पोळ यांनी गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. यावर संतप्त तिघा कर्मचाऱ्यांनी त्यांच्या गाडीच्या आडवे बॅरेकेटस लावले. ते काढण्यासाठी पोळ गाडीतून खाली उतरले असता कर्मचाऱ्यांनी त्यांना अरेरावी करीत धक्काबुक्की केली. यावेळी त्यांनीही कर्मचाऱ्यांशी दोन हात केले. परंतु, कर्मचारी दोघे-तिघे
असल्याने त्यांनी पोळ यांना बेदम मारहाण केली. यावेळी टोलनाक्यांवर बंदोबस्तास असलेल्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पोळ यांची सुटका केली. या हाणामारीमुळे नाक्यावर गोंधळ उडाला. त्यानंतर पोळ यांनी थेट राजारामपुरी पोलीस ठाण्यात येऊन मारहाण करणाऱ्या आयआरबीच्या तिघा कर्मचाऱ्यांच्या विरोधात फिर्याद दिली. त्यानुसार या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अमृत देशमुख करीत आहेत.
दरम्यान, टोल दिला नाही या कारणावरून शाहू टोलनाक्यावर वाहनधारकास मारहाण झाल्याचे वृत्त शहरात समजताच नागरिकांतून संताप व्यक्त होत होता.
प्रत्येक टोलनाक्यावर आयआरबी कंपनीने गुंड प्रवृत्तीचे तगडे कर्मचारी वसुलीसाठी नियुक्त केले आहेत. त्यांच्याकडे बघितल्यास वाहनधारकाने भीतीनेच टोल भरला पाहिजे, असे वातावरण सर्व टोलनाक्यांवर पाहायला मिळते. टोल विरोधातील आंदोलनाची धार कमी झाल्याने गेल्या कांही दिवसांपासून या कर्मचाऱ्यांची दादागिरी वाढली असून, वाहनधारकांना अपमानास्पद बोलणे, त्यांना धमकावणे असे प्रकार सुरू आहेत. टोल देणार नाही म्हटले की नाक्यावरील कर्मचारी एकत्र येऊन वाहनधारकास दादागिरी करून टोल भरण्यास भाग पाडतात. टोलच्या वसुलीवरून रोज प्रत्येक नाक्यावर वादावादीचे प्रकार घडत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The owner of the IRB staff beat the driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.