गुऱ्हाळघर मालकही आर्थिक अरिष्टात..
By Admin | Updated: November 21, 2014 00:36 IST2014-11-21T00:03:21+5:302014-11-21T00:36:45+5:30
२५ ते ३० हवे मनुष्यबळ : गुऱ्हाळघर उभारणीस २५ लाखांचा खर्च .

गुऱ्हाळघर मालकही आर्थिक अरिष्टात..
प्रकाश पाटील - कोपार्डे -ग्रामीण भागात ज्यांची चार ते पाच एकर शेती आहे, असे शेतकरीच शेती सांभाळत छोटासा व्यवसाय म्हणून गुऱ्हाळघराची उभारणी करतात. या व्यवसायासाठी लागणारा पैसा, मनुष्यबळ, स्थावर मालमत्ता गुंतविताना गुऱ्हाळघर मालकांच्या आवाक्याबाहेर गेले असून, एका गुऱ्हाळघरासाठी किमान २५ लाखांची गुंतवणूक करून स्वत:ची एकर, दीड एकर जमीन गुंतवावी लागते.
एक गुऱ्हाळघर उभा करावयाचे झाल्यास त्यासाठी स्वत:ची किमान एकरभर जमीन लागते. गुऱ्हाळघरासाठी ऊसतोड मजुरांसह घाणकरी, गुळवे अशी एकूण २५ मजुरांची आवश्यकता असून, प्रत्येक मजुराला त्याच्या कामाप्रमाणे २५० ते ४०० रुपये मजुरी द्यावी लागते. हे मजूर आपल्याकडे हंगामात कामासाठी यावेत यासाठी १५ ते २० हजार रुपये अॅडव्हान्स द्यावा लागतो.
गुऱ्हाळघर उभारणारे शेतकरी हे सर्वसामान्य असतात. त्यामुळे त्यांना पैसे उभा करण्यासाठी बॅँक, अडते व व्यापारी यांच्याकडे बिगर हंगामात हात पसरावे लागतात. यात बॅँका जरी कमी व्याजदराने पैसे देत असले तरी व्यापारी व अडत दुकानदार उचललेल्या पैशावर २० ते २५ टक्के व्याजदर लावतात.
एवढे करून जर गुळाचे दर पडल्यास शेतकरी आपला ऊस गुऱ्हाळघराला पाठवत नाहीत. त्यावेळी त्यावेळी स्वत:चा ऊस गाळावा लागतो. कारण मजुराची सध्या २५० रुपये दिवसाला मजुरी व एक किलो गूळ द्यावा लागतो. तर गुळव्याला ४०० रुपये व दोन किलो गूळ द्यावा लागतो. दिवसाला किमान या मजुरांची सहा हजार २५० रुपये मजुरी होते. जिल्ह्यातील १३०० गुऱ्हाळघरांपैकी केवळ ४२५ गुऱ्हाळघरे सुरू आहेत. शिंदेवाडी (ता. करवीर) येथील गुऱ्हाळघर मालकांने तर, गुऱ्हाळघर म्हणजे हत्ती पाळण्यासारखे आहे, अशी प्रतिक्रिया देताना यावर्षी गुऱ्हाळघर बंद करून ट्रॅक्टर कारखान्याला लावल्याची प्रतिक्रिया दिली.