बाहेरच्या खासदारांचा हातभार

By Admin | Updated: July 17, 2014 00:19 IST2014-07-17T00:02:59+5:302014-07-17T00:19:44+5:30

विकासाला हातभार

Outside MPs | बाहेरच्या खासदारांचा हातभार

बाहेरच्या खासदारांचा हातभार

प्रवीण देसाई - कोल्हापूर
आतापर्यंत बाहेरील राज्यसभा खासदारांनी जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावला आहे. यावर्षीही खासदारांनी जिल्ह्यासाठी निधीची शिफारस केली आहे. पुण्याचे राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी शाहूवाडी तालुक्यासाठी तब्बल दोन कोटी तीन लाख रुपये, तर राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांनी शहरातील विकासकामांसाठी ६० लाख रुपये निधीची शिफारस केली आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहात (कळंबा जेल) सात शौचालये बांधण्यासाठी ३ लाख ५० हजार रुपये निधी देण्यासाठी कॉँग्रेसचे खासदार राजीव शुक्ला यांनी पत्र दिले आहे. तोंडावर असलेले आचारसंहितेचे सावट पाहता या शिफारशींवर पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा नियोजन समितीमध्ये लगबग सुरू आहे.
काकडे यांचा कोल्हापूर किंवा शाहूवाडीशी तसा कोणताही संबंध नसताना आपल्या एकूण निधीच्या जवळ-जवळ अर्ध्या निधीची शिफारस जिल्ह्यातील एका तालुक्यासाठी केल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. शाहूवाडी तालुक्यातील ४४ गावांमधील रस्ते कॉँक्रिटीकरण, पाईपलाईन, संरक्षकभिंत बांधणे, पाण्याची टाकी बसविणे, आदी कामांसाठी हा निधी आहे. शुक्ला यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहासाठी सात शौचालयांकरिता ३ लाख ५० हजार निधी देण्याची शिफारस केली आहे. त्याबरोबरच वंदना चव्हाण यांनी कोल्हापूर शहरासाठी ६० लाख रुपये निधीची शिफारस केली आहे. यामध्ये क्रीडा व व्यायाम साहित्यासाठी १५ लाख रुपये व सामाजिक सभागृह-सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी ४५ लाख रुपयांचा समावेश आहे. याशिवाय आतापर्यंत म्हणजे २०११-१२ ते २०१३-१४ या काळात एकूण ११ राज्यसभा सदस्यांकडून जिल्ह्यासाठी २ कोटी ३० लाख ४७ हजार ६५४ रुपये निधी मंजूर झाला आहे. यातील बहुतांश निधी विविध कामांवर खर्चही झाला आहे. यामध्ये कॉँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांनी गणेशवाडी (ता. शिरोळ) येथील सामाजिक सभागृह बांधकामासाठी १५ लाख रुपये मंजूर केले आहेत. त्याबरोबरच भाजपचे खासदार प्रकाश जावडेकर यांनी ५५ लाख रुपये, शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी ४ लाख रुपये, कॉँग्रेसचे डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी २५ लाख रुपये, भाजपचे खासदार पीयूष गोयल यांनी २७ लाख ४७ हजार ६५४ रुपये, राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांनी पाच लाख रुपये दिले आहेत.
कॉँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी ४१ लाख रुपये, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तत्कालीन खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी १० लाख रुपये, शिवसेनेचे तत्कालीन खासदार मनोहर जोशी यांनी तीन लाख रुपये, भाजपचे तत्कालीन खासदार बाळासाहेब आपटे यांनी तीन लाख रुपये, तत्कालीन राष्ट्रवादीचे खासदार गोविंदराव आदिक यांनी २५ लाख रुपये मंजूर केले आहेत.

Web Title: Outside MPs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.