आंतरपिकातून निघाला उत्पादन खर्च
By Admin | Updated: December 16, 2014 23:45 IST2014-12-15T23:28:59+5:302014-12-16T23:45:25+5:30
एकरी ८० टन ऊस उत्पादनाचा बोनस : लाटगाव येथील शेतकऱ्याचा प्रयोग

आंतरपिकातून निघाला उत्पादन खर्च
१२०० मि.मी.पेक्षा जास्त पाऊस असणाऱ्या भागात ऊस लागवड करणे उत्पादनाच्या दृष्टीने अडचणीचे असते, असे कृषितज्ज्ञांकडून सांगितले जात असतानाच चित्री प्रकल्पाच्या शेजारी असणाऱ्या व तीन ते चार हजार मि.मी. पाऊस असणाऱ्या लाटगाव येथे बापूसाहेब खामकर यांनी एकरी ७५ ते ८० टन ऊस उत्पादित केला असून, दोन एकरांमध्ये घेतलेल्या उसामध्ये कलिंगड हे आंतरपीक घेऊन त्यांनी उसाचा संपूर्ण खर्च आंतरपिकातून वसूल केला, तर दोन एकरांमधून दीडशे टन ऊस बोनस रूपात मिळणार आहे.
खामकर यांनी दोन क्षेत्रांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर पाच फुटी सरी सोडून फुटावर उसाची डोळा लागण केली. ठिबक सिंचनच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा केला. एका डोळ्याला सुमारे २५ ते ३० फुटवे आले असून, यंदा विक्रमी उत्पादन मिळणार, असे चित्र आहे. पहिल्या टप्प्यात जानेवारीपर्यंत या ओढ्यातील पाणी शेतीसाठी वापरले जाते, त्यानंतर चित्रीतील पाणी ओढ्यामधील बंधाऱ्यात साठवून शेतीसाठी वापरले जाते. खामकर यांनी ऊस पिकाचे उत्पादन घेतानाच त्यांनी कलिंगड या आंतरपिकाद्वारे ४० हजार रुपयांची घसघशीत कमाई करीत दोन एकरांतील उसाचा उत्पादन खर्चही वसूल केला आहे. सांगली येथील स्वप्निल कनगुले यांचेही खामकर यांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे.
- ज्योतिप्रसाद सावंत, आजरा
१० ते १४ किलो वजनाची कलिंगडे
खामकर यांनी घेतलेल्या आंतरपीक स्वरूपातील ‘कलिंगड’ पिकाचेही आश्चर्यकारक निकष त्यांना मिळाले असून, प्रत्येक कलिंगडाचे वजन सरासरी १० ते १४ किलो इतके भरले.
शेतकऱ्यांकरिता पथदर्शक
प्रतिकूल परिस्थितीतही अत्यंत चिकाटीने घेतलेले हे पीक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पथदर्शक ठरत आहे. अनेक शेतकरी खामकर यांच्या शेतामध्ये भेट देत असून, एकरी १०० टन ऊस उत्पादित करण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखविला.