सोशल मीडियावरून झालेल्या प्रेमातून मुंबईच्या तरुणीने गाठले थेट प्रियकराचे घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:28 IST2021-09-22T04:28:22+5:302021-09-22T04:28:22+5:30
मुंबई येथील नालासोपारा परिसरात राहणाऱ्या एका वीसवर्षीय तरुणीची पट्टणकोडोली येथील एका तरुणाबरोबर सोशल मीडियावरून मैत्री निर्माण झाली. यातून पुढे ...

सोशल मीडियावरून झालेल्या प्रेमातून मुंबईच्या तरुणीने गाठले थेट प्रियकराचे घर
मुंबई येथील नालासोपारा परिसरात राहणाऱ्या एका वीसवर्षीय तरुणीची पट्टणकोडोली येथील एका तरुणाबरोबर सोशल मीडियावरून मैत्री निर्माण झाली. यातून पुढे मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. दोघांनीही संसार थाटण्याच्या उद्देशाने आणाभाकाही घेतल्या. प्रेमातील गुलाबी अनुभवही घेतले. प्रियकर मुंबई येथे या तरुणीच्या घरी जाऊन राहूनही आला होता, तर तरुणीही काही महिन्यांपूर्वी पट्टणकोडोली येथील प्रियकराच्या घरी राहून गेली होती. मात्र, काही दिवसांपासून प्रियकराने तिच्याशी संपर्कच टाळल्याने तरुणीने आज सकाळी आपल्या आईसोबत थेट प्रियकराचे घरच गाठले. या तरुणीला पाहताच प्रियकाराचे आणि त्याच्या नातेवाइकांचे चांगलेच धाबे दणाणले होते. तरुणीने घरातच ठिय्या मांडत लग्न करण्याची मागणी प्रियकराकडे केली. मात्र, प्रियकर व त्याच्या नातेवाइकांनी लग्नास नकार दिल्याने या तरुणीने येथील गावखणीत उडी मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी येथील उपस्थित ग्रामस्थांनी तिला अडवून पुन्हा प्रिकराबरोबर चर्चेस बसविले. तरीही प्रियकराने लग्नास नकार दिला. तरुणीने मात्र खूप आटापिटा केला. मात्र, प्रिकराच्या मनाला पाझर न फुटताच, तो लग्न न करण्याच्या मागणीवरच ठाम राहिला. ग्रामस्थांनी या तरुणीची व तिच्या आईची समजूत काढून तिला पुन्हा मुंबईस परत पाठविले. हा प्रकार जवळजवळ चार तास चालू होता. यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.