...अन्यथा कर्नाटकात घुसू
By Admin | Updated: August 4, 2014 00:16 IST2014-08-04T00:16:22+5:302014-08-04T00:16:22+5:30
विद्या चव्हाण यांचा इशारा : राष्ट्रवादी काँग्रेसचा महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर दीड तास ‘रास्ता रोको’

...अन्यथा कर्नाटकात घुसू
कागल : कर्नाटक सरकारच्या वरवंट्याखाली अनेक वर्षे भरडला जात असलेल्या मराठी भाषिकांच्या पाठीशी अख्खा महाराष्ट्र उभा आहे. तेथील मराठी भाषिक जनतेवर कर्नाटक पोलिसांनी येळ्ळूरसारखा अत्याचार पुन्हा केला, तर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे कार्यकर्ते कर्नाटकात घुसतील, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा आमदार विद्याताई चव्हाण यांनी आज, रविवारी दिला. ‘येळ्ळूर’ येथे कर्नाटक पोलिसांकडून मराठी भाषिकांवर करण्यात आलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज, रविवारी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉँग्रेस महिला आघाडीच्यावतीने पुणे-बंगलोर महामार्गावर महाराष्ट्र कर्नाटक सीमा असणाऱ्या दूधगंगा नदीजवळ जोरदार आंदोलन करण्यात आले. तब्बल दीड तास महामार्ग रोखून धरण्यात आल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
यावेळी मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, येळ्ळूर येथे महिला, बालकांवरही भ्याड लाठी हल्ला झाल्याने तमाम मराठी भाषिक संतप्त झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी महिला आघाडीच्या राज्यातील प्रमुख कार्यकर्त्या आज बेळगावमार्गे येळ्ळूरला जाण्यासाठी येथे आल्या होत्या. आम्ही त्यांना पाठबळ देण्यासाठी येथे आंदोलनात उतरलो आहोत.
आमदार चव्हाण म्हणाल्या, कर्नाटक पोलिसांनी आम्हाला रोखले असले तरी यापुढच्या काळात गनिमी काव्याने कर्नाटकात जाऊ. आमच्या मराठी भाषिकांना धीर देण्यासाठी आम्ही जात राहू. कर्नाटक पोलिसांच्या कारवाईला भीक घालणार नाही.
यावेळी खासदार धनंजय महाडिक, आ. के. पी. पाटील, आ. संध्यादेवी कुपेकर, भैया माने, आशाकाकी माने, निवेदिता माने, उषाताई दराडे, संगीता खाडे, वैशाली नागोडे, सुरेखा पाटील, शिवानंद माळी, मालोजी अष्टेकर, आदींचीही भाषणे झाली. (प्रतिनिधी)