अनाथ मुलींना मिळाले जोडीदार
By Admin | Updated: July 31, 2014 00:46 IST2014-07-31T00:45:01+5:302014-07-31T00:46:31+5:30
रविवारी विवाहसोहळा : बालकल्याण संकुलातील विद्या, ज्योती बनणार सख्ख्या जावा

अनाथ मुलींना मिळाले जोडीदार
कोल्हापूर : अनाथांचे घर असलेल्या बालकल्याण संकुलामध्ये कौटुंबिक असाहाय्यतेमुळे वयाच्या नवव्यावर्षी दाखल झालेली विद्या आणि वयाच्या ११व्या वर्षी दाखल झालेली ज्योती या दोन मुलींना त्यांच्या जन्माचा जोडीदार मिळाला आहे.
या दोघींचा विवाह कऱ्हाडमधील गोटे गावातील गिरीष आणि गजेंद्र वाळिंबे या सख्ख्या भावांशी निश्चित झाला असून, रविवारी (दि.३) हा विवाह सोहळा होणार आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश शिपूरकर, मानद कार्यवाह भिकशेठ पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संस्थेच्या आवारातच दुपारी १२ वाजून ३८ मिनिटांनी हा सोहळा होणार आहे. यावेळी विद्याचे कन्यादान
डॉ. सुभाष व स्नेहल आठले, तर ज्योतीचे कन्यादान डॉ. सचिन व कश्मिरा शहा करणार आहेत.
गिरीश आणि गजेंद्र हे सख्खे भाऊ असून, त्यांचे गोटे येथे स्वत:चे घर आहे. वडील गोविंद कृष्णाजी वाळिंबे हे निवृत्त कर्मचारी असून, आईचे देहावसान झाले आहे.
या विवाहासाठी ज्ञानेश्वर भस्मे हे वधूंना मणी-मंगळसूत्र, शां. कृ. पंत वालावलकर कापड दुकान ट्रस्ट यांच्याकडून वधू-वरांचे पेहराव, आराम गादी कारखाना यांच्याकडून गादी, नूपुर फुटवेअर यांच्याकडून वधूंना चप्पल, पुष्पक लेडीज वेअरकडून वधूंना वस्त्रे, हरिप्रिया बॅग्ज यांच्याकडून सुटकेस, सिद्धी ट्रेडर्स यांच्याकडून पेढे देण्यात येणार आहेत.
शिवस्वरूप एंटरप्रायजेसकडून वधू-वरांच्या नावाची थर्माकोलची अक्षरे, प्रभाकर निगडे यांच्याकडून मंडप उभारणी करून देण्यात येणार आहे. यावेळी सहमानद कार्यवाद पद्मजा तिवले, नगिरा नदाफ, पी. के. डवरी, अमर माने, स्वप्निल शेटे, सागर व्हटकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)