अंबाबाई मंदिरातील मुळ फरशी येणार उजेडात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:26 IST2021-09-18T04:26:44+5:302021-09-18T04:26:44+5:30

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी समितीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार घेतल्यापासून अंबाबाई मंदिर परिसरातील सुधारणांवर भर दिला आहे. येथील प्रलंबित प्रश्न जाणून ...

The original floor of the Ambabai temple will come to light | अंबाबाई मंदिरातील मुळ फरशी येणार उजेडात

अंबाबाई मंदिरातील मुळ फरशी येणार उजेडात

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी समितीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार घेतल्यापासून अंबाबाई मंदिर परिसरातील सुधारणांवर भर दिला आहे. येथील प्रलंबित प्रश्न जाणून घेण्यासाठी शुक्रवारी सकाळी ९ वाजता त्यांनी मंदिराची पाहणी केली. यावेळी सचिव शिवराज नायकवडी, हेरिटेज समितीच्या अध्यक्षा अमरजा निंबाळकर उपस्थित होत्या. नायकवडी यांनी त्यांना या विषयांची माहिती दिली. श्री अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यातील भिंतींना व खालीदेखील संगमरवरी फरशी बसविण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी गाभाऱ्यातील भिंतींवरील ही फरशी काढण्यात आली. पण खालची फरशी अजून तशीच आहे. काही दिवसांपूर्वी येथील एक संगमरवरी फरशी काढून बघण्यात आली. त्यावेळी या फरशीखाली जांभा प्रकारातील मूळ फरशी सुस्थितीत असल्याचे दिसून आले आहे. ही मूळ फरशी प्रकाशात आणण्यात येणार आहे. त्यासाठी पुरातत्व खात्याची परवानगी घेण्यात आली असून हेरिटेज समितीच्या मार्गदर्शनाखाली हे काम करण्यात येणार आहे.

गणपती विसर्जन झाल्यानंतर आणखी काही फरशा काढून सगळीकडे दगडी फरशी एकसमान आहे का, त्या सुस्थितीत आहेत का, की त्याला टवके पडले आहेत हे बघण्यात येणार आहे. फरशी सुस्थितीत असेल तर वरील संगमरवरी फरशी काढून टाकली जाईल. मंदिराच्या छतावर सिमेंट काँक्रीटचा मोठा थर आहे, तो काढून टाकून छपरांना लागलेल्या गळतीचा विषयदेखील हाती घेण्यात आला आहे.

---

दहा वर्षांपूर्वी अंबाबाई मंदिर आवारात शहरातील ड्रेनेज लाईन वळवून सांडपाणी थेट मणिकर्णिका कुंडात सोडण्यात आले. सध्या कुंड खुले झाले आहे. ड्रेनेज लाईन मंदिराबाहेरून वळवण्यासाठी ३० लाखांवर खर्च येणार असून महापालिकेने हात वर केले आहे. त्यावर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्याशी चर्चा केली. पूर्व दरवाज्याबाहेरील ७० टक्के रस्ता देवस्थान समितीच्या ताब्यात द्या आम्ही ड्रेनेज लाईन वळवण्याचा खर्च करू असे सांगितले आहे.

---

फोटो नं १७०९२०२१-कोल-अंबाबाई मंदिर

ओळ : कोल्हापुरात शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी अंबाबाई मंदिराच्या छपरावरील सिमेंट काँक्रिटचा थर व गळतीची पाहणी केली. यावेळी सचिव शिवराज नायकवडी, अमरजा निंबाळकर यांच्यासह देवस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

---

Web Title: The original floor of the Ambabai temple will come to light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.