मूळ २९ कोटींचा प्रकल्प, गेला ११४ कोटींवर
By Admin | Updated: July 25, 2015 01:13 IST2015-07-24T00:25:59+5:302015-07-25T01:13:30+5:30
काम रखडल्याचा फटका : आतापर्यंत ९५ कोटी रुपये खर्च; आणखी ५० कोटींच्या निधीची गरज

मूळ २९ कोटींचा प्रकल्प, गेला ११४ कोटींवर
रवींद्र येसादे - उत्तूर -आंबेओहळ प्रकल्पाच्या कामासाठी सुरुवातीस २९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र, पहिली तीन वर्षे वगळता प्रकल्प १५ वर्षे रखडला. यामुळे वेळोवेळी महागाईमुळे प्रकल्पाच्या कामासाठी ११४ कोटी मंजूर करण्यात आले. त्यानुसार प्रकल्पाची कामे व पुनर्वसन आदींसाठी ९५.३६ कोटी रुपये खर्च झाले. प्रकल्पाचे उर्वरित
काम व पुनर्वसनाच्या मंजूर रकमेसाठी ५० कोटींपेक्षा अधिक निधीची गरज आहे. भू-संपादन व पुनर्वसनासाठी २१ कोटींची तसेच धरण व अनुषंगिक कामासाठी ४० कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. अतिरिक्त ४१ कोटी जादा निधी उपलब्ध झाल्यास सन २0१६-१७ मध्ये घळभरणी होऊ न पाणीसाठा होऊ शकतो.
आजअखेर प्रकल्प कामाची सद्य:स्थिती
धरणाची माथापातळी ६९०.२३० मी. आहे. साखळी क्रमांक २१० मी., तर २०४० मी. भागातील रोधी चर खोदाई व भरावाचे काम पूर्ण झाले आहे. डाव्या व उजव्या तिरावरील कामासाठी निधीची गरज आहे. कोल्हापूर पद्धतीच्या सहा बंधाऱ्यांचे काम पूर्ण झाले असून, गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील बंधाऱ्यासाठी निधीची गरज आहे.
मातकाम ७० टक्के पूर्ण
प्रकल्पाच्या डाव्या तिरावरील ६८१.० मी. व उजव्या तिरावरील ६८२.०० मी. तलावापर्यंत मातकाम आहे. हे काम ७० टक्केपूर्ण झाले आहे. उर्वरित काम अद्याप अपूर्णच राहिलेले आहे.
विद्युत विमोचक
सिंचन तथा विद्युत विमोचकाचे खोदकाम पूर्ण झाले असून, ऊर्ध्वनलिका, शुष्कविहीर, पाणतळ व यांत्रिकी घटकांची कामे ८० टक्के पूर्ण आहेत.
सांडवा काम अंतिम टप्यात
प्रकल्पास द्वाररहित डकबिल प्रकारचा सांडवा आहे. या प्रकल्पाच्या सांडव्याची लांबी ८० मी.असृून त्याची खुदाई पूर्ण आहे. सांडवा पुच्छ कालव्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. सांडवा संधानकाचे ५ टक्के काम पूर्ण होणे बाकी आहे.
घळभरणीचे काम जवळपास पूर्ण
प्रकल्पाच्या दोन्ही तिरावरील मातकाम व दगडी पिचिंगचे काम पूर्ण झाले आहे. आधी पुनर्वसन मगच घळभरणी, असा शासनाचा निर्णय आहे. त्यामुळे घळभरणीचे काम २० टक्के अपूर्ण आहे. प्रकल्पाचे काम सध्या ८० टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे. मात्र, विस्थापितांचे प्रश्न अर्धवट स्थितीत आहे.