साखर कामगारांसाठी आज परिषदेचे आयोजन
By Admin | Updated: May 11, 2015 01:07 IST2015-05-11T01:05:27+5:302015-05-11T01:07:07+5:30
अनेक प्रश्न प्रलंबित : आंदोलनाची दिशा ठरवणार

साखर कामगारांसाठी आज परिषदेचे आयोजन
कोल्हापूर : राज्यातील ऊसतोडणी कामगार, साखर कारखान्यांचे कामगार व ऊस वाहतूकदार यांच्या विविध प्रश्नांबाबत आगामी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आज, सोमवारी कोल्हापुरात राज्यस्तरीय परिषद होत आहे. राज्य शासनाने ऊसतोडणी कामगारांना तोडणीदरात वाढीची घोषणा केली; पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही. साखर कामगारांची देणी अशा अनेक प्रश्नांबाबत या परिषदेत जोरदार चर्चा होणार आहे.
ऊसतोडणी कामगारांच्या मजुरीवाढीच्या कराराची मुदत संपून वर्ष झाले. संपलेल्या हंगामात शासनाने केवळ चर्चेचे गुऱ्हाळ घातले. शेवटच्या क्षणी वाढ केली; पण त्याची अंमलबजावणीही केलेली नाही. वाढती महागाई पाहता ऊसतोड कामगारांना पोट भरणे मुश्कील झाले आहे. त्याचबरोबर एफ. आर. पी.प्रमाणे पैसे दिले नसल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये कारखान्यांकडे थकीत आहेत. परिणामी शेतकरी अडचणीत आला आहे. कारखान्यांचा गळीत हंगाम संपून दोन महिने होत आले तरी पैसे दिलेले नाहीत. साखर कामगारांच्या वेतनाचा प्रश्नही आहे. या सर्व प्रश्नांबाबत अनेक वेळा शासकीय पातळीवर चर्चा केली. आंदोलन केले, मोेर्चे काढले; पण शासनाने फारशी दखल घेतलेली नाही. हा हंगाम तसाच गेला. किमान आगामी हंगामाबाबत तरी ठोस निर्णय घेण्यासाठी राज्यस्तरीय परिषदेचे कोल्हापुरात आयोजन केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी-वाहतूक कामगार संघटनेचे सरचिटणीस प्रा. डॉ. सुभाष जाधव यांनी दिली.
या परिषदेचे उद्घाटन ‘सिटू’चे राज्य सचिव डॉ. डी. एल. कराड यांच्या हस्ते व उद्धव भवलकर यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. यावेळी डॉ. अजित नवले, अण्णा सावंत यांच्यासह ऊसतोडणी कामगार, राज्य साखर कामगार, ऊस वाहतूकदार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत ठराव केले जाणारच; पण आगामी आंदोलनाचे रणशिंगही फुंकले जाणार असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)