वारणानगरला आजपासून कृषी प्रदर्शनाचे आयोजन
By Admin | Updated: December 9, 2014 23:24 IST2014-12-09T21:17:16+5:302014-12-09T23:24:16+5:30
ऊस पीक परिसंवाद व कृषी पुरस्काराचे वितरण आणि शनिवारी (दि. १३) प्रदर्शनाचा सांगता समारंभ

वारणानगरला आजपासून कृषी प्रदर्शनाचे आयोजन
वारणानगर : तात्यासाहेब कोरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वारणानगर (ता. पन्हाळा) येथे बुधवारी (दि. १०) ते शनिवार (दि. १३) या कालावधीत ‘वारणा कृषी प्रदर्शन २०१४’ आयोजित केल्याची माहिती वारणा समूहाचे प्रमुख व माजी मंत्री विनय कोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.बुधवारी सकाळी दहा वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी ‘स्वच्छ वारणा - सुंदर वारणा’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली जाणार आहे.शास्त्रीभवन शेजारील पटांगणावर हे कृषी प्रदर्शन होणार आहे. या प्रदर्शनात १७५ वर स्टॉल सहभागी होणार असून, दि. १२ रोजी ‘शेवरगावच्या धर्तीवर या प्रदर्शनात विशेष सहभाग म्हणून शेळीपालन युनिट व मधमाशापालन युनिट उभारण्यात येणार आहे. या प्रदर्शनास शेती व्यवसायासाठी आधुनिक यंत्रसामग्री, ट्रॅक्टर, शेती औजारे, खते, बी-बियाणे, शेतीपूरक उद्योग व विमा, बॅँकांचा पतपुरवठा, ठिबक सिंचन शासकीय योजना, आदी माहिती व प्रात्यक्षिक तसेच नावीन्यपूर्ण शेती उत्पादने पाहावयास मिळणार आहेत. बुधवारी (दि. १०) सकाळी दहा वाजता कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन, दुपारी १२ वाजता ऊस पीक परिसंवाद, गुरुवारी (दि. ११) विविध कंपन्यांचे प्रतिनिधी व शेतकऱ्यांची थेट चर्चा, माहिती देवघेव, शुक्रवारी (दि. १२) ऊस पीक परिसंवाद व कृषी पुरस्काराचे वितरण आणि शनिवारी (दि. १३) प्रदर्शनाचा सांगता समारंभ होणार आहे. यावेळी वारणा कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक व्ही. एस. कोले, सचिव बी. जी. सुतार, शेतीपूरकचे व्यवस्थापक आर. बी. कुंभार, संचालक हिंदुराव तेली व प्रकाश मोरे, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)