‘संकलन बंद’चे ‘गोकुळ’चे काही संस्थांना आदेश

By Admin | Updated: January 21, 2015 00:09 IST2015-01-21T00:03:23+5:302015-01-21T00:09:59+5:30

विधानसभेचे राजकारण : करवीरमधील सहा दूध संस्थांचा समावेश

Orders for 'Gokul' organizations of 'Compilation' | ‘संकलन बंद’चे ‘गोकुळ’चे काही संस्थांना आदेश

‘संकलन बंद’चे ‘गोकुळ’चे काही संस्थांना आदेश

राजाराम लोंढे - कोल्हापूर  जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ)शी संलग्न असणाऱ्या काही प्राथमिक दूध संस्थांना संकलन बंद करण्याचे आदेश आज, मंगळवारी सायंकाळी संघाने दिल्याने संस्थापातळीवर एकच खळबळ उडाली. करवीर तालुक्यातील सुमारे सहा दूध संस्थांना अशा प्रकारच्या नोटिसा काढल्या असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. विधानसभा निवडणुकीच्या राजकारणातून ही कारवाई केल्याची चर्चा सुरू आहे.
अांतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूध पावडरीचे दर घसरल्याने दूध संघ अडचणीत आले आहेत. त्यामुळे अतिरिक्त पावडर तयार झाली असून, संघाला दूध जास्त झाले आहे. अतिरिक्त दुधामुळे ‘गोकुळ’ला तोटा सहन करावा लागत आहे. यासाठी आपल्या दूध संस्थेचे संकलन उद्यापासून बंद करावे, असे परिपत्रक आज सायंकाळी संघाच्या सुपरवायझरनी संबंधित प्राथमिक दूध संस्थांना लागू केले. त्यामुळे संस्थापातळीवर खळबळ उडाली.
आठ दिवसांपूर्वीच राज्यातील दूध संघांनी दूध पावडरीचे दर कोसळल्याने दूध खरेदी दरात कपात केली होती; पण आपण कपात करणार नसल्याचे स्पष्टीकरण ‘गोकुळ’चे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी दिले होते. चार दिवसांपूर्वी दहा लाख लिटर संकलनपूर्तीचा कार्यक्रमही जोमात करीत नेत्यांनी दूध उत्पादकांचे तोंड भरून कौतुक केले होते. पंधरा लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा लवकरच पूर्ण करा, अशा शुभेच्छाही नेत्यांनी दिल्या होत्या.
मात्र, आज दूध संघाच्या प्रशासनाने काही संस्थांना असे परिपत्रक काढल्याने दूध संस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. या संस्था पाहिल्या तर विधानसभा निवडणुकीत विरोधात गेलेल्या कार्यकर्त्यांच्या दूध संस्था आहेत. करवीर तालुक्याच्या उत्तरेकडील भागातील या संस्था असून राजकारणातून ‘संकलन बंद’ची कारवाई केल्याने संस्थाचालकांसह दूध उत्पादकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दूध संकलन बंद करण्याच्या नोटिसा काढलेल्या संस्था या विरोधी गटातील असल्याने या कारवाईने तालुक्यातील राजकारण ‘गोकुळ’च्या निवडणुकीच्या तोंडावर चांगलेच ढवळून निघाले आहे.

ज्येष्ठ संचालकांकडून प्रकरण थंड
परिपत्रकाबाबत या संस्थाचालकांनी थेट ‘गोकुळ’च्या एका ज्येष्ठ संचालकांकडे विचारणा करून जाब विचारला. दूध उत्पादकांच्या बाबतीत राजकारण करू नका, अशी तंबी एका संस्थाचालकाने दिल्याने त्या संचालकाने हे प्रकरण थंड करीत संकलन बंद केले जाणार नसल्याची ग्वाही दिल्याने या प्रकरणावर पडदा पडल्याचे समजते.


दूध संकलन बंद केल्याचे परिपत्रक काही संस्थांना काढल्याबाबत काही फोन आले होते; पण तसा कोणताही निर्णय संघाने घेतलेला नाही.
- दिलीप पाटील (अध्यक्ष, गोकुळ)

Web Title: Orders for 'Gokul' organizations of 'Compilation'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.