हिशेब चुकता करण्यासाठीच ‘ताराराणी’ रिंगणात
By Admin | Updated: January 19, 2017 00:59 IST2017-01-19T00:59:32+5:302017-01-19T00:59:32+5:30
महादेवराव महाडिक

हिशेब चुकता करण्यासाठीच ‘ताराराणी’ रिंगणात
कोल्हापूर : जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमधील सत्तेसाठी नव्हे तर काहीजणांचे हिशेब चुकते करण्यासाठीच ताराराणी आघाडी रिंगणात उतरल्याचा इशारा माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी दिला. येत्या चार दिवसांत महाडिक गटाची भूमिका जाहीर करू, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची जिल्ह्यात रणधुमाळी सुरू आहे. भाजपने दोन्ही कॉँग्रेसमधील दिग्गजांना पक्षात घेण्यास सुरुवात केली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली असून, महादेवराव महाडिक यांच्या भूमिकेबाबत जिल्ह्यात उत्सुकता आहे. याबाबत बुधवारी
पत्रकारांशी बोलताना महाडिक म्हणाले, वाईट हेतूने राजकारण करणारी मंडळी जास्त काळ टिकत नाहीत. मी आता कोणत्याही पक्षात नसल्याने मला बंधन नाही, मी मोकळा आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काय भूमिका घ्यायची, हे अद्याप काही ठरविलेले नाही; पण महाडिक असो अथवा ‘ताराराणी’ आघाडी; सत्तेसाठी आम्ही कधीच राजकारण करीत नाही.
‘स्वाभिमानी’ भाजपसोबत येण्यास तयार नाही, जिल्ह्णात रोज नव्याने आघाड्या आकारास येत आहेत, याबाबत विचारले असता, ‘थोडे दिवस थांबा, चित्र स्पष्ट होईल,’ अशी सावध प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
काहीजणांचे केले, आणखी दोघांचे करणार
विधानपरिषद निवडणुकीतील काहीजणांचे हिशेब नगरपालिका निवडणुकीत चुकते केले आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आणखी दोघांचे हिशेब चुकते करायचे आहेत, असेही महाडिक यांनी स्पष्ट केले.