सरेवाडी येथील बांधकामाचा भ्रष्टाचार उघड होऊनदेखील बिल अदा करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:23 IST2021-05-23T04:23:49+5:302021-05-23T04:23:49+5:30
बसरेवाडी येथे १४ वा वित्त आयोगातून काँक्रीटचा रस्ता आणि गटर्सचे काम करण्यात आले आहे. या कामाचा ठेका शेळेवाडी येथील ...

सरेवाडी येथील बांधकामाचा भ्रष्टाचार उघड होऊनदेखील बिल अदा करण्याचे आदेश
बसरेवाडी येथे १४ वा वित्त आयोगातून काँक्रीटचा रस्ता आणि गटर्सचे काम करण्यात आले आहे. या कामाचा ठेका शेळेवाडी येथील ठेकेदार सूरज पाटील यांनी घेतलेला आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने सुरुवातीपासून काही गावकरी तक्रार करीत होते; पण ठेकेदाराने ग्रामपंचायत प्रशासन आणि स्थानिक पुढाऱ्यांना हाताशी धरून तक्रारदारांना बाहेरचा रस्ता दाखविला होता. त्यामुळे दत्तात्रय पाटील यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी एस. जे. पवार यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यांनी या तक्रारीची दखल घेऊन बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता वायचळ यांना तपासणीचे आदेश दिले. त्यांनी या कामाची तपासणी केली असता कामात दगडगोट्यांचा वापर केला असल्याचे आढळून आले. त्यामुळे अभियंता वायचळ यांनी गटरचे काम केल्याशिवाय कोणतेही बिल काढणार नसल्याचे आश्वासन तक्रारदाराला दिले होते. मात्र, तीन महिन्यांनी वायचळ यांनी रस्त्याबाबत तक्रारदाराची तक्रार नसल्याचे सांगत रस्त्याचे बिल अदा करण्यासाठीचा अहवाल गटविकास अधिकारी यांना सादर केला.
कोट : विस्तार अधिकारी आणि उपअभियंता यांच्याकडील अहवाल पाहून आणि ग्रामपंचायत सरपंच, सदस्य यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार केवळ रस्त्याचे बिल अदा करण्याच आदेश दिला आहे. गटर्सचे बिल राखीव ठेवले आहे. - एस. जे. पवार, गटविकास अधिकारी
कोट : या कामाबाबत गटविकास अधिकारी यांचा आदेश प्राप्त झाल्याने पदाधिकाऱ्यांच्या मासिक सभेपुढे हा विषय ठेवून त्यांच्या निर्णयानंतर बिल अदा करण्यात येणार आहे. - माधुरी पाटील, ग्रामसेविका
कोट : विकासकामांतील भ्रष्टाचार उघड होऊनही परस्पर सरपंच संदीप पाटील, ग्रामसेविका पाटील यांच्याशी चर्चा करून बिल अदा करणाऱ्या प्रशासनाला आता न्यायालयात खेचणार आहे. - दत्तात्रय पाटील, तक्रारदार