शिंगणापूर कोविड सेंटरवरील अनागोंदीच्या चौकशीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:25 IST2021-09-18T04:25:00+5:302021-09-18T04:25:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर जिल्हा परिषदेच्यावतीने चालवण्या येत असलेल्या शिंगणापूर कोविड सेंटरवरील अनागोंदीच्या ...

शिंगणापूर कोविड सेंटरवरील अनागोंदीच्या चौकशीचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्यावतीने चालवण्या येत असलेल्या शिंगणापूर कोविड सेंटरवरील अनागोंदीच्या चौकशीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी शुक्रवारी दिले. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ‘लोकमत’ने या कोविंड सेंटरवर तब्बल एक तास एकही कर्मचारी उपस्थित नसल्याचे सचित्र वृत्त शुक्रवारी प्रसिध्द केले होते. त्याची दखल घेऊन चव्हाण यांनी ही कार्यवाही केली.
करवीर तालुक्यातील शिंगणापूर येथील जिल्हा परिषदेच्या विद्यानिकेतनमध्ये गतवर्षीपासून कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. येथील सर्व यंत्रणा जिल्हा परिषदेने उभारली आहे. सध्या या ठिकाणी दोन महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आले.‘लोकमत’च्या प्रतिनिधीने बुधवारी रात्री साडेनऊ ते साडेदहा या एक तास या सेंटरवर थांबून छायाचित्रे घेतली. छायाचित्रण केले. परंतु या ठिकाणी कोणीही कर्मचारी उपस्थित नव्हते. याचे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर मात्र अनेकांचे धाबे दणाणले आहे.
चव्हाण यांनी या वृत्ताबाबत डॉ. योगेश साळे यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली. तेव्हा आरोग्य विभागाने ही सेंटर्स बंद करण्याच्या सूचना केल्याचे सांगितले. केवळ सांगून चालणार नाही तर नेमके कोणी बंद केले आहेत, कुणी सुरू ठेवले आहे याची माहिती घ्या. तासभर एकही कर्मचारी सेंटरवर उपस्थित नसतो ही बाब गंभीर आहे. जिल्ह्यातील सर्वच कोरोना सेंटर्सची नेमकी स्थिती काय आहे याची माहिती सादर करण्याच्या सूचनाही चव्हाण यांनी दिल्या आहेत.
चौकट
दोन स्वतंत्र अहवालाची मागणी
कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने सेंटर्स बंद करण्याची सूचना दिली असतानाही हे केंद्र सुरू का ठेवले आणि या ठिकाणी रात्रीच्या वेळी महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक का केली असे दोन स्वतंत्र अहवाल देण्याच्या सूचना चव्हाण यांनी डॉ. योगेश साळे यांना दिल्या आहेत. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून याचा अहवाल मागवून घेत असल्याचे डॉ. साळे यांनी चव्हाण यांनाी सांगितले आहे.