दैवज्ञ गोल्डमेक प्रदर्शन आजपासून
By Admin | Updated: January 16, 2015 00:42 IST2015-01-16T00:41:27+5:302015-01-16T00:42:13+5:30
कोल्हापूर : सुवर्ण कारागीरही धरणार आधुनिकतेची कास

दैवज्ञ गोल्डमेक प्रदर्शन आजपासून
कोल्हापूर : अलंकार बनविण्यासाठी लागणाऱ्या विविध यंत्रांच्या सहाय्याने कोल्हापूरची सुवर्ण कारागिरी जगाच्या नकाशावर पुन्हा एकदा उजळावी. याकरीता दैवज्ञ शिक्षण समाजच्यावतीने सुवर्णकारागीरांना लागणाऱ्या मशिनरीचे प्रात्यक्षिकांसह प्रदर्शन उद्यापासून दैवज्ञ बोर्डिंग समाज येथील गंगाधर पेंडूरकर सभागृहात भरत आहे. या पार्श्वभूमीवर आज, गुरुवारी दुपारी विविध यंत्रांची चाचणी घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. कोल्हापुरी साज, ठुशी, अशा विविध सुवर्णालंकारांची निर्मिती कोल्हापुरात होते. मात्र, सध्या दिल्ली, राजकोट, आग्रा, कलकत्ता, तंजावर, बडोदा, ग्वाल्हेर, मुंबई आदी शहरांतून कोल्हापुरात बनणारे सुवर्णालंकार तेथून कोल्हापूरसह देशभरात विक्रीसाठी जात आहेत. त्याला स्पर्धा व गुणवत्ता कारणीभूत आहे. कोल्हापुरातील कारागीर धंद्यात मंदी आहे, एवढेच सर्वत्र सांगत असतात. मात्र, प्रत्यक्षात तयार दागिन्यांच्या विविध कंपन्याच्या शोरूम कोल्हापुरात होत आहेत. या ठिकाणी विक्री होणारे सुवर्णालंकार पाहिले असता, ते राजकोट, ग्वाल्हेर, दिल्ली, आग्रा, मुंबई, तंजावर, सूरत, अहमदाबाद आदी ठिकाणांहून तयार केलेले असते.
विशेष म्हणजे या शोरूममध्ये विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात हे दागिने येत आहेत. मात्र, कोल्हापूर हे सुवर्ण अलंकारासाठी जगभरात प्रसिद्ध असूनही यामध्ये कमी पडत आहे. स्पर्धेच्या काळात नाजूक दागिन्यांची वाढती मागणी व पुरवठा यात शहरातील सुवर्णालंकार कारागीर मागे पडत आहेत. त्याचा विचार केला तर आजही हाताने बनविलेल्या अलंकारावरच अनेक सुवर्णकार बंधू व्यवसाय करत आहेत. मात्र, आधुनिक जगाचा विचार करता यंत्राचा वापर करून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणे काळाची गरज बनली आहे.
याचा विचार करून दैवज्ञ समाज शिक्षण (बोर्डिंग) या संस्थेने पुढाकार घेऊन आधुनिक प्लेटिंग मशीन, अंगठी कारागीरांसाठी लागणारी सर्व अद्यावत मशिनरी, इलेक्ट्रीक आटणी मशीन, सर्वप्रकारचे जोडकाम करण्यासाठी लागणारी मशिनरी, पॉलिश मशीन, कास्टिंग ब्रेसलेटचे मशीन, थ्री इन वन कास्टिंग मशीन, कॅडकॉम मशीन, मेडिया पॉलिशर यासह कॅटलॉग, हत्यारे व उपकरणे या प्रदर्शनात आणली आहेत. या प्रदर्शनाची जय्यत तयारी आज संस्थेच्या पेंडुरकर सभागृहात दिवसभर सुरू होती. (प्रतिनिधी)
रिफायनरीचे आकर्षण
या प्रदर्शनात २ किलो क्षमतेचे सुवर्ण रिफायनरी मशीन व पाच किलो चांदी रिफायनरी मशीनचे प्रात्यक्षिक दाखविले जाणार आहे. या मशिनरी कमी जागेत सामावणाऱ्या आहेत. त्यामुळे या रिफायनरी मशीनचे सुवर्ण कारागीरांना मोठे आकर्षण असणार आहे. याशिवाय दिवसभरात शेकडो अंगठया तयार करणारे मशीनही आकर्षण ठरेल, असा कयास प्रदर्शन संयोजकांना आहे.