पर्यायी रस्त्यांची संयुक्त पाहणी
By Admin | Updated: December 9, 2014 00:56 IST2014-12-09T00:38:50+5:302014-12-09T00:56:08+5:30
महापौरांची घोषणा : कृती समितीचा मनपाच्या दारात ठिय्या; या रस्त्यांना नागरिकांचाही विरोध

पर्यायी रस्त्यांची संयुक्त पाहणी
कोल्हापूर : शहरातील आयआरबीच्या सर्व नऊ टोलनाक्यांवर पर्यायी रस्त्यांची सोय करा. या मागणीसाठी आज, सोमवारी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या कार्याकर्त्यांनी महापालिकेच्या दारात सुमारे अडीच तास ठिय्या मारला. मागणीचे निवेदन ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील व अॅड. गोविंद पानसरे यांनी महापौर तृप्ती माळवी यांना दिले. कृती समितीला महिन्याभरापूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार पर्यायी रस्त्यांचे काम सुरू होईल, या रस्त्यांची कृती समिती व मनपा अधिकारी-पदाधिकाऱ्यांची संयुक्त पाहणी करण्याची घोषणा महापौरांनी यावेळी केली.
महापौर माळवी यांनी कृती समितीला १० नोव्हेंबरला पर्यायी रस्ते महिन्यात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी एक कोटींचा निधी देण्याची घोेषणाही केली होती. मात्र, अद्याप हे रस्ते वाहतुकीसाठी योग्य नाहीत. या रस्त्यांची बांधणी येत्या सहा दिवसांत करा, या मागणीसाठी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी मनपाच्या दारात आज सकाळी अकरा वाजल्यांपासून ठिय्या मारला. ‘पर्यायी रस्ते झालेच पाहिजेत’, ‘चले जाव, चले जाव, आयआरबी चले जाव’ ‘देणार नाही... देणार नाही... टोल आम्ही देणार नाही’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या. पर्यायी रस्ते कधी करणार, खासदार महाडिक यांचा निधी मिळाला काय? आदी प्रश्नांचा जाब कृती समितीने निवेदनाद्वारे महापौरांना विचारला.
महापौर माळवी म्हणाल्या, खासदार महाडिक यांनी घोषणा केल्याप्रमाणे पर्यायी रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करण्याची तरतूद सुरू केली आहे. महापालिकेने या सर्व रस्त्यांच्या कामाचा अहवाल पाठविला आहे. निधीची उपलब्धता होताच सार्वजानिक बांधकाम विभागातर्फे ही कामे सुरू केली जातील. तत्पूर्वी महापालिकेने स्वनिधीतून यातील बहुतांश रस्त्यांची दुरुस्ती केली आहे. मात्र, वाहतुकीची वर्दळ होईल, या कारणास्तव हे रस्ते करण्यास स्थानिक नागरिकांना विरोध आहे. याबाबतचे निवेदनही नागरिकांनी दिले आहे. अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्यासह कृती समितीच्या पदाधिकाऱ्यानी उद्या, मंगळवारी रस्त्यांची संयुक्त पाहणी करून या नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करावा, असे महापौरांनी स्पष्ट केले. यावेळी या पर्यायी रस्त्यांच्या सद्य:स्थितीबाबत शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी माहिती दिली.
यावेळी स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण नगरसेवक भूपाल शेटे, सत्यजित कदम, निवास साळोखे, चंद्रकांत यादव, अॅड. सुरेशराव साळोखे, दिलीप देसाई, दिलीप पोवार, अशोक पवार-पाटील, अॅड. बाबा इंदुलकर, बजरंग शेलार, अनिल घाटगे, बाबा पार्टे, बाबासाहेब देवकर, दीपाताई पाटील, वैशाली महाडिक, किसन कल्याणकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
टोलविरोधी कृती समितीने पर्यायी रस्त्यांच्या मागणीसाठी महापालिकेच्या दारात सोमवारी ठिय्या आंदोलन केले. दुसऱ्या छायाचित्रात कोल्हापुरातील टोलला पर्यायी रस्ते करा, या मागणीचे निवेदन ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील व गोविंद पानसरे यांनी महापौर तृप्ती माळवी यांना दिले. यावेळी सचिन चव्हाण, दिलीप पोवार, बाबा पार्टे, सत्यजित कदम, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
हे होणार पर्यायी रस्ते
शिरोली नाकारस्त्याचे नावअंदाजे कि.मी.
शिरोलीतृष्णा हॉटेल ते कत्तलखाना१.२०
ते जाधववाडी गणेश मंदिर
उचगावउचगाव नाका ते राजपल्लू नाका५०० मीटर
शाहू नाकाउजळाईवाडी ग्रामीण भाग तुळजाभवानी
नगर ते (सर्व्हे नं १७४) ते जे. आर. कॉलनी
ते जुना पुणे-मुंबई रोड१ कि.मी.
कळंबा नाकासाईमंदिर ते रिंगरोड ते बापूराम नगर५०० मीटर
टोलविरोधी समितीच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी सुमारे अडीच तास महापालिकेच्या दारात ठिय्या आंदोलन केले. आयआरबीविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.