रत्नागिरी : केंद्र सरकारतर्फे कृषी विधेयक शेतकरी हितासाठी मांडण्यात येत असतानाच विविध पक्ष त्याला विरोध करीत आहेत. वास्तविक स्वामीनाथन् शिफारशीवर मोदी सरकारने काम केले आहे. या समितीच्या शिफारशी लागू केल्या तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. मात्र, विविध पक्ष शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे काम करीत आहेत. मूळ विचारधारा सोडून त्यांची दुटप्पी भूमिका असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केले.
आपल्या रत्नागिरी दौऱ्याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, महिला जिल्हा उपाध्यक्षा ऐश्वर्या जठार, शहराध्यक्ष सचिन करमरकर, महिला शहराध्यक्ष राजश्री शिवलकर, युवा मोर्चा अध्यक्ष अनिकेत पटवर्धन, नगरसेवक उमेश कुळकर्णी, प्रभारी विजय सालीम, आदी उपस्थित होते.
कंत्राटी शेती, लॅण्ड लिजिंग, मॉडेल एपीएमसी कायदा महाराष्ट्रात झाला. १३ वर्षांपूर्वी हे कायदे करण्यात आले असून, तो कायदा केंद्राने जसाच्या तसा राबविण्याचे धोरण अवलंबले असतानाच त्याला विरोध केला जात आहे. राज्यात खासगी बाजार समिती कार्यरत असताना केंद्राने आणलेल्या विधेयकाला विरोध केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी कृषिमंत्री शरद पवार यांचे कृषी क्षेत्रात खूप मोठे योगदान आहे. बाजार समित्या सुधारण्यासाठी आग्रही आहेत. आंदोलनात सहभागी द्रमुक, आपचे अरविंद केजरीवाल, अकाली दल, समाजवादी पक्ष, तृणमूल तसेच शिवसेना, डावे पक्ष या सर्वांची सुरुवातीची भूमिका व आताची भूमिका यामध्ये फरक आहे. मूळ विचारधारा सोडून त्यांनी दुट्प्पी भूमिका अवलंबली आहे. विरोधासाठी विरोध करून राजकारण करीत आहेत. वास्तविक शेतकरी अन्नदाता असल्याने त्याच्या हितार्थ सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले.
सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करीत आहे. त्यांच्याशी चांगल्या प्रकारे चर्चा होऊन निश्चितच सकारात्मक निर्णय होईल, अशी आम्हा सर्वांना अपेक्षा आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.