दर्शन मंडपास विरोधच --पुरातन वास्तू संवर्धन कसे असेल?
By Admin | Updated: July 2, 2016 00:57 IST2016-07-02T00:48:12+5:302016-07-02T00:57:49+5:30
भक्त समितीचा सवाल : २० मुद्द्यांवर महापालिकेकडे हरकती
दर्शन मंडपास विरोधच --पुरातन वास्तू संवर्धन कसे असेल?
कोल्हापूर : अंबाबाई मंदिर विकास आराखड्यात पुरातन वास्तू संवर्धनासाठी साडेबारा कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या कामाचे स्वरूप काय असणार आहे, त्यात अंबाबाई मूर्तीवरील नागचिन्ह घडविण्यासह महाकाली व महासरस्वतीच्या मूर्तींचे संवर्धन होणार काय, अशी विचारणा
श्री अंबाबाई भक्त समितीतर्फे करण्यात आली आहे.
अंबाबाई मंदिर विकास आराखडा सादरीकरणानंतर महापालिकेने जनतेकडून सूचना मागविल्या होत्या. त्यावर अंबाबाई भक्त समितीने जवळपास
२० मुद्द्यांवर महापालिकेकडे हरकती व सूचना मांडल्या आहेत. संभाजी साळुंखे, महेश उरसाल व प्रमोद सावंत यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुरातन वास्तू संवर्धनामध्ये अंबाबाई मूर्तीसह महाकाली, महासरस्वतीच्या मूर्ती तसेच परिसरातील अन्य भग्न मूर्तींचा समावेश केलेला दिसत नाही. परिसरातील छोट्या मंदिरांच्या भिंतींचे दगड निखळण्याच्या अवस्थेत आहेत. मागील वर्षी मंदिराच्या काही कोपऱ्यांच्या शिळा कोसळल्या आहेत. त्यामुळे मंदिराची बारकाईने तपासणी करून त्याची डागडुजी करणे महत्त्वाचे आहे.
दर्शन मंडप नव्याने बांधण्यापेक्षा आजूबाजूला असलेल्या इमारतींचा वापर करणे योग्य ठरेल. स्काय वॉक संकल्पना बघितल्यावर लक्षात येते की, फोट्रेस कंपनीने अंबाबाईचे उत्सव, नगरप्रदक्षिणा, पालखी, किरणोत्सव यांचा कोणताही अभ्यास केलेला नाही. पहिला टप्पा पावसाळ्यानंतर सुरू केल्यास सदर प्रस्तावात किती रुपयांची वाढ होणार आहे? किरणोत्सवातील अडथळ्यांचा विचार आराखड्यात केलेला नाही.
मंदिरात देवस्थानच्या कार्यालयाजवळ देवस्थान समितीचेच विश्रामगृह आहे. या तीन मजली इमारतीत असलेले स्वच्छतागृह महिला व लहान मुलांना वापरण्यासाठी तत्काळ खुले करण्यात यावे. हा आराखडा तीन टप्प्यांत करण्यात येणार असल्याने तो संपूर्ण जनतेसमोर ठेवण्यात यावा. अन्यथा, पहिल्या टप्प्याची दुसऱ्या टप्प्याशी व दुसऱ्या टप्प्याची तिसऱ्या टप्प्याशी एकसंधता राहणार नाही.
गेल्या पाच वर्षांत आय.आर.बी.चा रस्ते प्रकल्प, पर्यायी शिवाजी पूल, अंबाबाई रासायनिक संवर्धन प्रक्रिया, सेफ सिटी यांसारख्या मोठ्या कामांमध्ये सावळागोंधळ होऊन कोल्हापूरची बदनामी होत आहे. याची जाणीव ठेवून हा विकास आराखडासुद्धा या पंक्तीत जाणार नाही, याची काळजी घ्यावी. या हरकतींवर समर्पक माहिती मिळाली नाही तर जनआंदोलन उभारले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
दर्शन मंडपास विरोधच
आर्किटेक्ट असोसिएशन : अंबाबाई मंदिर विकास आराखड्यावर अभ्यासपूर्ण हरकती
कोल्हापूर : अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत नियोजित करण्यात आलेल्या दर्शन मंडप या इमारतीस आर्किटेक्ट असोसिएशननेही विरोध केला आहे. नव्याने बांधण्यात येणाऱ्या या वास्तूमुळे मंदिराचे शिखर दर्शन, विद्युत रोषणाईत अडथळा ठरणार आहेच; शिवाय खुदाईमुळे मूळ मंदिराच्या रचनेलाही धोका पोहोचणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
महापालिकेने केलेल्या आवाहनानुसार शुक्रवारी असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अॅँड इंजिनिअरिंग कोल्हापूर या नामवंत संस्थेने आपल्या हरकती शुक्रवारी मांडल्या. असोसिएशनचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजेंद्र सावंत, उपाध्यक्ष सुधीर राऊत, सचिव शिवाजी पाटील, संदीप घाटगे यांच्यासह अन्य सदस्यांनी अत्यंत अभ्यासपूर्णरीत्या तब्बल १२ पानांमध्ये आराखड्यातील तरतुदींमुळे होणाऱ्या अडचणी व अन्य पर्याय मांडले आहेत.
निवेदनात, नियोजित दर्शन मंडपाची इमारत ही मंदिराच्या कळसाच्या व दक्षिण दरवाजावरील शिखर दर्शनास, नवरात्रोत्सवातील विद्युत रोषणाईत अडथळा ठरणारी आहे. भवानी मंडपाची रचना मंदिरास साजेल अशी आहे. त्यानुसार मोकळ्या जागेवर बांधकाम केल्यास पर्यटकांच्या गर्दीमुळे आणीबाणीची परिस्थिती येऊ शकते. ऐतिहासिक वास्तुकलेनुसार हा परिसर मोकळाच असला पाहिजे. दर्शनमंडपासाठी करावे लागणारे खोदकाम दक्षिण दरवाजाजवळील भिंतीपासून नऊ मीटरवर असणार आहे. मंदिरातील दगडी फरशीची उंची, संरक्षक भिंती यांचा विचार करता कोणत्याही प्रकारचे उत्खनन मंदिराला धोकादायक ठरू शकते. येथील ड्रेनेज लाईनचे स्थलांतर करणे जोखमीचे आहे. ड्रेनेजची गळती झाल्यावर झिरपणारे मलमिश्रित पाणी मंदिराच्या पायापर्यंत आत शिरू शकते. याशिवाय अन्य पर्याय सुचविण्यात आले आहेत. तसेच गरज असल्यास आराखडा राबविण्यास असोसिएशनचे पूर्ण सहकार्य असेल भूमिका मांडण्यात आली आहे.