‘हिरण्यकेशी’च्या उपसाबंदीला विरोध
By Admin | Updated: December 11, 2015 00:52 IST2015-12-11T00:29:26+5:302015-12-11T00:52:16+5:30
किसान संघ : आंदोलनाचा इशारा; उपसा नियोजनाची मागणी

‘हिरण्यकेशी’च्या उपसाबंदीला विरोध
गडहिंग्लज : ११ डिसेंबरपासून हिरण्यकेशी नदीतील पाणी शेतीसाठी उपसण्यास पाटबंधारे खात्याने केलेल्या बंदीला भारतीय किसान संघाने तीव्र विरोध केला आहे. जानेवारीपर्यंत उपसा कालावधी वाढवावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा येथील उपअभियंत्यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सप्टेंबर २०१५ मध्ये हिरण्यकेशी नदीतील पाण्याच्या नियोजनासंदर्भात किसान संघाचे शिष्टमंडळ उपअभियंत्यांना भेटले होते. त्यावेळी चर्चेसाठी पुन्हा बोलवू, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्याबाबत कोणताही निरोप मिळाला नाही.
दरम्यान, अचानक ११ डिसेंबरपासून उपसा बंदीची सूचना जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पाण्याअभावी शेतातील उभ्या उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. हाताशी आलेला ऊस कारखान्याला सुस्थितीत घालविण्यासाठी जानेवारीपर्यंत उपसा कालावधी वाढवावा. जानेवारीनंतर शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन शिल्लक पाणीसाठा पाहून उपसा कालावधीचे नियोजन करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. शिष्टमंडळात तालुकाध्यक्ष बाळगोंड पाटील, राम पाटील, अजित नडगदल्ली, उमाशंकर मोहिते, सुनील कराळे, अशोक देशपांडे, गुरुराज हत्ती, अॅड. सत्यजित मोळदी, आदींचा समावेश होता.
उपसाबंदी ३५ दिवस
चित्री धरणात सध्या १३३४ एमसीएफटी पाणीसाठा आहे. त्यापैकी ३०० एमसीएफटी पाणी आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव ठेवण्याचा आदेश आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी जुलै २०१६ पर्यंत पुरावे यासाठी शेतीसाठी पाणी उपसण्यास बंदी घालण्यात आली आहे. आज, शुक्रवारपासून १५ जानेवारी २०१६ अखेर ही उपसाबंदी कायम राहणार आहे.
पूर्ण क्षमतेने वीज द्या
उपसा काळात वीज यंत्रणा दुरुस्तीची व नूतनीकरणाची कामे काढू नयेत, तांत्रिक अडचण आल्यास वीजप्रवाह बंद ठेवलेला कालावधी वाढवून मिळावा आणि वीजपुरवठा पूर्ण क्षमतेने व पूर्ण दाबाने मिळावा अशी मागणीदेखील किसान संघाने महावितरण कंपनीच्या येथील कार्यकारी अभियंत्याकडे निवेदनातून केली आहे.