‘राजाराम’च्या निवडणुकीत विरोधी गट ताकद लावणार
By Admin | Updated: February 19, 2015 23:39 IST2015-02-19T23:32:59+5:302015-02-19T23:39:47+5:30
महाडिक गट सक्रिय : पॅनेलमध्ये बावडा केंद्रस्थानी

‘राजाराम’च्या निवडणुकीत विरोधी गट ताकद लावणार
रमेश पाटील - कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या प्राथमिक मतदार यादीवर दाखल झालेल्या सर्व १६ हरकती नुकत्याच फेटाळण्यात आल्या होत्या. याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्यात आल्याने ‘राजाराम’च्या निवडणुकीत विरोधी गट पूर्ण ताकदिनिशी रिंगणात उतरणार हे आता स्पष्ट झाले आहे.
राजारामची एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी प्राथमिक मतदार यादी जाहीर झाली. या यादीवर १६ हरकती दाखल झाल्या. या सर्व हरकती सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर) वाय. व्ही. सुर्वे यांनी फेटाळून लावल्या.
हरकती फेटाळल्यानंतर विरोधी माजी मंत्री सतेज पाटील गटाने उच्च न्यायालयात दाद मागण्याचा आणि निवडणूक ताकदिनिशी लढविण्याचा निर्णय घेतला. त्याचाच एक भाग म्हणून उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली.
प्राथमिक मतदार यादीवर हरकती घेणारे सर्व शेतकरी कसबा बावड्यातील आहेत. ४२४१ सभासदांच्या सभासदत्वावर या हरकती नोंदविण्यात आल्या होत्या. प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी दिलेल्या निकालाबाबत पाच वेगवेगळ्या याचिकांद्वारे आर. के. पाटील, विश्वास नेजदार, बाळासाहेब पाटील, अनंत पाटील, नितीन पारखे यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.
दरम्यान, या निवडणुकीत आपण पूर्ण ताकदिनीशी रिंगणात उतरणार असल्याचे कारखान्याचे माजी अध्यक्ष विश्वास नेजदार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ते म्हणाले, सध्या पॅनेल तयार करण्याचे काम सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक ही लढविली जाणार आहे, सध्या त्यादृष्टीने तयारी सुरू आहे.
मतदार यादीची प्रक्रिया सुरूच राहणार
आपण दिलेल्या निर्णयावर उच्च न्यायालयात हरकतदारांनी दाद मागितली आहे. मात्र, जोपर्यंत उच्च न्यायालयाकडून कोणताही आदेश येत नाही तोपर्यंत आपण मतदार यादीची प्रक्रिया तशीच सुरूच ठेवणार आहे.
- वाय. व्ही. सुर्वे, प्रादेशिक सहसंचालक (साखर)
‘राजाराम’कडे जिल्ह्याचे लक्ष
राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत पुन्हा एकदा आमदार महादेवराव महाडिक व माजी मंत्री सतेज पाटील आमने-सामने येणार असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
सतेज पाटील गट या निवडणुकीबाबत आक्रमक झाला आहे. आमदार महाडिक गटानेही निवडणुकीची तयारी जोरात सुरू ठेवली आहे.
दोन्ही पॅनेलमध्ये बावड्याला स्थान
राजारामच्या निवडणुकीत सत्तारूढ आणि विरोधी अशा दोन्ही पॅनेलमध्ये प्रत्येकी दोन ते तीन उमेदवारांना हमखास स्थान मिळणार आहे. कारण ‘राजाराम’च्या निवडणुकीत बावडा केंद्रस्थानी असणार आहे.